तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा ही चैन नसून गरज

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२६: आधुनिक घरांची व्याख्या अनेकदा त्यातील ‘स्मार्ट’ आणि स्वयंचलित सुविधांवरून केली जाते. मात्र, शहरी भागात स्मार्ट जीवनशैली वाढत असतानाच घरातील सुरक्षिततेचा प्रश्नही अधिक महत्त्वाचा ठरत आहे. हंसा रिसर्चच्या ‘सिक्युअर बाय डिझाइन स्टडी २०२६’ (Secure by Design Study 2026) नुसार, ९०% शहरी भारतीयांच्या मते तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा व्यवस्था ही चैनीची बाब नसून एक मूलभूत गरज आहे.

गृह सुरक्षा महिन्याचा एक भाग म्हणून, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या ‘सिक्युरिटी सोल्युशन्स’ व्यवसायाने बिल्डर्स, डेव्हलपर्स, आर्किटेक्ट्स आणि डिझाइनर्सना घरांच्या नियोजन आणि बांधकामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच सुरक्षेचा समावेश करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ग्राहकांनीही घर खरेदी करण्यापूर्वी, घरात राहायला जाण्यापूर्वी किंवा नूतनीकरण सुरू करण्यापूर्वीच सुरक्षेचा विचार करावा, असे कंपनीने सुचवले आहे. दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘गृह सुरक्षा दिना’च्या संकल्पनेवर आधारित हा अभ्यास यंदा गृह सुरक्षा महिन्याद्वारे पुढे नेला जात आहे.

अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष आणि बदलती मानसिकता: सुरक्षेची गरज जाणवत असली तरी प्रत्यक्ष सुरक्षिततेच्या भावनेत तफावत दिसून येते:

  • असुरक्षिततेची भावना: १३% प्रतिसादकर्त्यांना आपले घर असुरक्षित वाटते, तर ७% लोक याबाबत स्वतःच साशंक आहेत.
  • दैनिक कौटुंबिक चिंता: कुटुंब बाहेर असताना घरफोडी किंवा घुसखोरी होण्याची भीती ६५% लोकांना वाटते, तर मुले घरी एकटी असताना ६०% लोकांना काळजी वाटते.
  • तंत्रज्ञानाचा स्वीकार: ५२% ग्राहक आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास अधिक उत्सुक आहेत.

आधीच्या नियोजनावर भर आणि कंपनीचे मत: घराचा ताबा मिळाल्यानंतर सुरक्षेचा निर्णय घरमालकावर सोपवण्याऐवजी, नियोजन, तपशील निश्चिती आणि हस्तांतरणाच्या टप्प्यांवरच इतर सुविधांसोबत सुरक्षेचाही विचार व्हावा, असे गोदरेजने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनीही घर कसे संरक्षण देईल, त्यात काय त्रुटी असू शकतात आणि सुरक्षेला घाईघाईचा बदल न मानता विचारपूर्वक निर्णय कसा घेता येईल, याचा आधीच विचार करणे गरजेचे आहे.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या ‘सिक्युरिटी सोल्युशन्स’ विभागाचे बिझनेस हेड पुष्कर गोखले म्हणाले की, ग्राहक तंत्रज्ञानाधारित सुरक्षेला आधुनिक घराचा अविभाज्य भाग मानत आहेत. बिल्डर्स, आर्किटेक्ट्स आणि डिझाइनर्सनी नियोजनापासून ताबा हस्तांतरणापर्यंत सर्व टप्प्यांवर सुरक्षिततेचा समावेश करावा, तर ग्राहकांनीही घर घेण्यापूर्वी किंवा राहायला जाण्यापूर्वी सुरक्षिततेचे मूल्यमापन करावे. परिसराचे प्रवेशद्वार, इमारतीचे प्रवेशद्वार, मुख्य दार आणि घरातील अंतर्गत भाग अशा सर्व स्तरांवर सर्वसमावेशक सुरक्षा असायला हवी. सुरक्षेकडे केवळ ‘खर्च’ म्हणून न पाहता ‘सक्षमीकरण करणारी गोष्ट’ (enabler) म्हणून पाहिले पाहिजे; कारण जोपर्यंत सुरक्षेचे नियोजन होत नाही, तोपर्यंत घर खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ ठरू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *