व्यवसाय नेटवर्किंग आणि AIच्या माध्यमातून उद्योजकीय विकासाला नवी दिशा

अर्थसंकेतचा ‘Diwali Business Conclave 2026 – The Growth Collage’ उत्साहात संपन्न; विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ प्रदान

मराठी उद्योजकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धीसाठी प्रभावी नेटवर्किंगचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) उद्योग-व्यवसायांमधील वापर प्रोत्साहित करणे तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करणे, या उद्देशाने अर्थसंकेततर्फे आयोजित ‘Diwali Business Conclave 2026 – The Growth Collage’ हा भव्य व्यावसायिक मेळावा दादर येथील राजश्री शाहू सभागृहात उत्साहात संपन्न झाला. विविध उद्योगक्षेत्रांतील उद्योजक, व्यावसायिक, बिझनेस नेटवर्किंग संस्था, सामाजिक संघटना आणि मान्यवरांच्या सहभागामुळे या संमेलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

व्यवसायवृद्धीसाठी परस्पर सहकार्य, व्यावसायिक संपर्कांचे बळकटीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या तीन प्रमुख संकल्पनांभोवती या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्यात व्यावसायिक संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि नव्या व्यावसायिक संधी निर्माण करण्यावर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमाला ग्लोबल सेंट अँजेलोज ग्रुपचे अध्यक्ष श्री. एग्नेलोराजेश अथायडे, माधवबागचे डॉ. रोहित साने, एमईपीएलचे श्री. सुधीर म्हात्रे, राजगुरू टूर्सचे संचालक श्री. राजन पाडलोस्कर, सरोज स्वीटच्या सौ. मनीषा मराठे आणि फ्रेंड्स फायनान्शियल सर्व्हिसेसचे श्री. मिलिंद बने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी उद्योजकांना व्यवसायविकास, परस्पर सहकार्य, बदलत्या बाजारपेठेतील संधी आणि व्यावसायिक क्षेत्रातील नव्या प्रवाहांबाबत मार्गदर्शन केले. शेअर मार्केट प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता आणि व्यावसायिक क्षेत्रातील योगदानासाठीही विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

सहभागी संस्था आणि नेटवर्किंग समूहांचा गौरव
या संमेलनाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे विविध व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अपना बाजार को-ऑपरेटिव्ह संस्था, राजापूर तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी, समर्थ व्यायाम मंदिर, वैश्य ग्लोबल चॅरिटेबल संस्था, ICEX Pro, J4E आणि GBS या सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.

शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या समर्थ व्यायाम मंदिरने मल्लखांब क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची विशेष दखल घेण्यात आली. संस्थेच्या शताब्दीपूर्तीच्या निमित्ताने तिचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध नेटवर्किंग संस्था आणि व्यावसायिक समूहांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सदस्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. संस्थात्मक पातळीवर परस्पर संवाद वाढविणे, व्यावसायिक सहकार्याची नवी दालने खुली करणे आणि विविध समूहांच्या कार्याला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश होता.

व्यवसायवृद्धीसाठी AI आणि नेटवर्किंगची भूमिका
डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्तारामुळे उद्योग-व्यवसायांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थितीत व्यवसायाची स्पर्धात्मक क्षमता वाढविण्यासाठी नेटवर्किंगबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक बनले आहे. मार्केटिंग, ग्राहक सेवा, विक्री, जाहिरात, कंटेंट निर्मिती आणि व्यवसाय व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत AI तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढविणे, वेळ आणि खर्चाची बचत करणे तसेच ग्राहकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचणे शक्य आहे. या संमेलनातून मराठी उद्योजकांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून बदलत्या व्यावसायिक संधींचा लाभ घ्यावा, हा संदेश देण्यात आला.

अर्थसंकेतचे संस्थापक श्री. अमित बागवे यांनी आपल्या मनोगतात व्यवसाय नेटवर्किंग ही केवळ ओळखी वाढविण्याची प्रक्रिया नसून परस्परांच्या व्यवसायवृद्धीत सहभागी होण्याची आणि एकमेकांना संधी उपलब्ध करून देण्याची प्रभावी व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले. मराठी उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि AI आत्मसात करून राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर आपली व्यावसायिक ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

‘महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ने मान्यवरांचा गौरव
महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक आणि उद्योजकीय विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात ‘महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. यामध्ये श्री. अनुप म्हात्रे, श्री. केशव कोरगावकर, सौ. सुनंदा कदम, सौ. मानसी गोडबोले, सौ. नीता पाताडे आणि श्री. आशीष संकपाळ यांचा समावेश होता. तसेच श्री. सुहास तेंडुलकर, श्री. प्रणित बाणे, श्री. आशीष फाटक आणि श्री. योगेश लाटणेकर यांचाही विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.

विविध ब्रँड्स आणि संस्थांचे सहकार्य
या उपक्रमाला M.K. Ghare Jewellers, Madhavbaug आणि Friends Financial Services यांचे गोल्ड स्पॉन्सर म्हणून सहकार्य लाभले. राजगुरू टूर्स हे सिल्व्हर पार्टनर होते. Rachna Arts & Creations, समृद्ध व्यापार आणि राष्ट्रसंचार यांनी आउटरीच पार्टनर म्हणून योगदान दिले. Travel Sanket, AI Growth Circle, K Creations आणि २० जून यांनी सपोर्ट पार्टनर म्हणून सहकार्य केले. Vivek Sharma Associates यांचेही कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले.

अर्थसंकेत गेल्या अनेक वर्षांपासून मराठी उद्योजकांच्या व्यावसायिक विकासासाठी, आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक जागरूकतेसाठी तसेच उद्योजकीय परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ‘The Growth Collage’ ही संकल्पना उद्योजक, व्यावसायिक, संस्था आणि नेटवर्किंग समूह यांना एका व्यासपीठावर आणून सामूहिक प्रगतीची दिशा देणारी ठरली.

‘एकमेकांना जोडूया, एकमेकांच्या व्यवसायाला संधी देऊया आणि एकत्रितपणे महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी योगदान देऊया’, हा संदेश देत या संमेलनाची सांगता झाली.

Arthsanket Diwali Business Conclave 2026
Arthsanket Diwali Business Conclave 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *