दिवंगत आई-वडिलांना माउंट एव्हरेस्टवरून जगावेगळी श्रद्धांजली: पोलीस निरीक्षक द्वारका डोके

दिवंगत आई-वडिलांना माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरून एक जगावेगळी श्रद्धांजली वाहण्याचे ध्येय उराशी बाळगून मोहिमेवर निघालेल्या पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांचा प्रवास प्रचंड जिद्दीचा आणि प्रेरणादायी आहे. मुळात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर भागातून येणाऱ्या द्वारका डोके कोणतीही पर्वतारोहणाची पार्श्वभूमी नसताना वयाच्या ४२ व्या वर्षी एका पुस्तकाच्या माध्यमातून या क्षेत्राकडे आकर्षित झाल्या. २०२२ मध्ये पहिल्या प्रयत्नात फुफ्फुसांमध्ये पाणी साचल्यामुळे आणि ऑक्सिजनची पातळी घसरल्यामुळे त्यांना मोहीम अर्धवट सोडावी लागली. मात्र, हार न मानता त्यांनी पुन्हा नव्याने शारीरिक व मानसिक तयारी केली आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत वयाच्या पन्नासाव्या वर्षी, २२ मे २०२४ रोजी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी आई-वडिलांच्या फोटोसह माउंट एव्हरेस्ट सर केले.

माउंट एव्हरेस्टच्या यशानंतर त्यांनी अष्टशिखरांच्या मोहिमेकडे पाऊल टाकले. न्यूझीलंडचे पर्वतारोही मार्क इंग्लिश यांच्या कृत्रिम पायांवर एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रेरणादायी पुस्तकाने त्यांना पुढे जाण्याची ऊर्जा दिली. २३ मे २०२५ रोजी त्यांनी जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाचे शिखर असलेल्या माउंट लोसेवर यशस्वी चढाई करून तिथे साईबाबांचे वस्त्र फडकावले आणि महामंत्राचा उच्चार केला. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी आठवे सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट मनास्लूवर पोहोचून राष्ट्रगीतासोबतच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत हिमालयातील हिमशिखरावर गाण्याचा मान मिळवला. पुढे १८ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामान आणि जोराच्या वाऱ्याचा सामना करत जगातील सातव्या क्रमांकाचे शिखर असलेल्या माउंट धवलागिरीवर यश मिळवले. तिथे जोरदार वाऱ्यामुळे शेरपाने ऑक्सिजन मास्क काढू दिला नाही; तरीही ऑक्सिजन मास्कसह त्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत आणि वंदे मातरमचे गायन केले.

पर्वतारोहणातील जोखमींवर बोलताना द्वारका डोके स्पष्ट करतात की हिमालयातील मोहिमांमध्ये मृतदेह, हिमवादळे, हिमवर्षाव, फ्रॉस्टबाईट, पल्मनरी किंवा सेरेब्रल एडिमा आणि स्नो ब्लाइंडनेस यांसारखी मोठी आव्हाने असतात. मनातील भीतीवर विजय मिळवून पूर्ण तयारीनिशीच पुढे जाता येते. स्वतःच्या बोटास फ्रॉस्टबाईट होऊनही आणि कापण्याचा सल्ला मिळूनही गेल्या दहा वर्षांपासून केवळ होमिओपॅथीच्या आधारे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा प्रवास सुरू ठेवला आहे.

विशेषतः महिला आणि तरुण मुलींना मार्गदर्शन करताना त्या सांगतात की वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मोठी स्वप्ने पाहता आणि पूर्ण करता येतात. प्रत्येक महिलेने आपल्या आयुष्यात औषधमुक्त आणि निरोगी राहण्याचे ध्येय ठेवावे. सकाळी आळस झटकून निसर्गाच्या सानिध्यात येत चालणे, धावणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे किंवा जिम यांपैकी कोणताही एक तासाचा व्यायाम केल्यास संपूर्ण आयुष्य निरोगी व सक्षम राहते.

Dwarka Dokhe Everest Lady
Dwarka Dokhe Everest Lady

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *