अपना बाजार आयोजित दादासाहेब सरफरे स्मृती व्याख्यानाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. अमित बागवे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ताकदीसह मर्यादा आणि आव्हानांवर केले मार्गदर्शन

मुंबई : अपना बाजारच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दादासाहेब सरफरे स्मृती व्याख्यान शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी नायगाव येथील अपना बाजार बँक्वेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात आणि श्रोत्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : ताकद, मर्यादा आणि आव्हाने’ या विषयावर अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक व्याख्यान दिले. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपल्या दैनंदिन जीवनाचा, व्यवसायाचा, शिक्षणाचा आणि विविध कार्यक्षेत्रांचा अविभाज्य भाग बनत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उपलब्ध होणाऱ्या संधी, कामकाजातील कार्यक्षमता, निर्णयप्रक्रियेतील त्याचे महत्त्व, तसेच या तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि भविष्यातील संभाव्य आव्हाने याविषयी डॉ. बागवे यांनी सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सविस्तर विवेचन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि जबाबदारीने वापर कसा करावा, याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपना बाजारचे उपाध्यक्ष श्री. श्रीपाद फाटक होते. यावेळी अपना बाजारचे अध्यक्ष श्री. अनिल गंगर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एस. टी. काजळे तसेच संचालक, पदाधिकारी, सभासद, कर्मचारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सभासद व सेवकांच्या पाल्यांनी शैक्षणिक परीक्षांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच संस्थेत २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

अपना बाजार ही संस्था केवळ ग्राहकसेवेपुरती मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उपक्रमांद्वारे समाजाशी आपले नाते अधिक दृढ करीत आहे. दादासाहेब सरफरे स्मृती व्याख्यानाच्या माध्यमातून दरवर्षी समाजाला दिशादर्शक ठरणाऱ्या विषयांवर विचारमंथन घडवून आणण्याची परंपरा संस्थेने जपली आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कार्यकारी संचालिका सारिका साळुंखे यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केलं.

श्रोत्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे आणि डॉ. अमित बागवे यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानामुळे यंदाचे स्मृती व्याख्यान विशेष संस्मरणीय ठरले.

Apna Bazar
Apna Bazar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *