त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
मुंबई : एसएससी आणि एचएससी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा टक्केवारी, गुणवत्ता यादी आणि शैक्षणिक स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा अधिक तीव्र असते. अशा वातावरणात पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठ्या त्यागाने सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्या त्यागाचे खरे चीज तेव्हाच होते, जेव्हा विद्यार्थी मेहनत, सातत्य आणि शिस्त यांच्या जोरावर यश संपादन करतो. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे वरळी येथील प्रथमेश शिंदे, ज्याने विज्ञान शाखेत तब्बल ९६.५ टक्के गुण मिळवत मुंबईत प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रथमेशचे यश हे केवळ बुद्धिमत्तेचे फलित नसून सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मशिस्त आणि कुटुंबाच्या पाठिंब्याचे प्रतीक आहे.
प्रथमेशचे वडील मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन शाखेत कार्यरत आहेत, तर आई गृहिणी असून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःला पूर्णतः समर्पित केले. मुलाने उत्तम शिक्षण घ्यावे आणि मोठे यश मिळवावे, हेच कुटुंबाचे स्वप्न होते. या स्वप्नासाठी प्रथमेशच्या धाकट्या भावानेही दोन वर्षे टीव्ही पाहणे पूर्णपणे बंद केले, जेणेकरून घरात अभ्यासासाठी शांत वातावरण राहील.
प्रथमेशने स्वतःही आपल्या अभ्यासात अत्यंत शिस्त राखली. त्याने मोबाईलपासून स्वतःला दूर ठेवत, अभ्यासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींपासून अंतर राखले. त्याच्या मते, यशाचे खरे रहस्य शेवटच्या क्षणी तासन्तास अभ्यास करण्यात नसून दररोज सातत्याने अभ्यास करण्यात आहे.
“मी रोज फक्त दोन ते तीन तास अभ्यास केला, पण तो पूर्ण सातत्याने केला. परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास सुरू करण्याची मी कधीच वाट पाहिली नाही,” असे प्रथमेश सांगतो.
त्याच्या मते, अनेक विद्यार्थी अभ्यास पुढे ढकलतात आणि त्यामुळे परीक्षेच्या काळात अनावश्यक ताण वाढतो. नियमित अभ्यास आणि योग्य वेळेचे नियोजन यामुळे यश सहज मिळवता येते. तसेच टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया आणि अनावश्यक फिरणे यांसारख्या गोष्टींपासून दूर राहणेही तितकेच आवश्यक असल्याचे तो सांगतो. मोबाईलचा वापरही त्याने केवळ शैक्षणिक संकल्पना समजून घेण्यासाठीच केला.
या उल्लेखनीय यशानंतर प्रथमेश आता AI Engineer बनण्याचे स्वप्न पाहत असून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोठे योगदान देण्याची त्याची इच्छा आहे.
प्रथमेश आपल्या यशाचे श्रेय Shiv Science Classes ला देखील देतो. त्याच्या मते, या क्लासेसने त्याच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात मजबूत आधारस्तंभाची भूमिका निभावली. शिक्षकांनी केवळ उत्कृष्ट अध्यापनच केले नाही, तर नियमित सराव, शंका निरसन आणि सतत प्रेरणा देत विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले.
मुंबईत अनेक नामांकित आणि जुन्या कोचिंग संस्थांमध्ये स्पर्धा असताना, अवघ्या सहा वर्षांत Shiv Science Classes ने मुंबईचा विज्ञान शाखेतील टॉपर घडवून उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशामागे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी समर्पित शिक्षकांची टीम उभी आहे.
सध्या शिव सायन्स क्लासेसच्या भायखळा, वरळी आणि प्रभादेवी येथे शाखा असून, ८वी ते १०वी तसेच ११वी-१२वी विज्ञान शाखेसोबत MH-CET, JEE आणि NEET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते.
या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शिव सायन्स क्लासेसतर्फे विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात प्रथमेश आणि त्याच्या कुटुंबाचे स्वागत करण्यात आले. तसेच त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ₹२५,००० रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला भायखळा विभागाचे नगरसेवक रोहिदास लोखंडे, ज्येष्ठ उद्योजक नीलकंठ चौधरी आणि अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले.
प्रथमेश शिंदेची यशोगाथा आणि शिव सायन्स क्लासेसचे यश हे दाखवून देते की, मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसते; त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, त्याग आणि कुटुंब व शिक्षकांचा भक्कम पाठिंबा तितकाच महत्त्वाचा असतो.


