मराठा मंडळ ठाणे आयोजित ‘उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न’ !
मराठा मंडळ ठाणे आयोजित ‘उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न’ !
‘मंडळाचा चौसष्ठावा वर्धापनदिन साजरा’
२० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता मराठा मंडळ ठाणे या सामाजिक संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्रात, “राजर्षी शाहू महाराज विचार मंच” आयोजित ‘उद्योजक मेळावा’ ठाणे परिसरातील उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला, दीप प्रज्वलन, महाराष्ट्र गीत व ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंडळाचे सरचिटणीस श्री राजेंद्र मधुकर साळवी यांनी सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित विविध क्षेत्रातील उद्योजक व्यावसायिक यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि समाजसेवक श्री हणमंतराव जगदाळे ‘अर्थसंकेत’ या नियतकालिकाचे संपादक डॉ. अमित बागवे, ‘मी उद्योजक होणारच’ या उद्योजकतेला वाहिलेल्या चळवळीचे प्रमुख श्री निलेश मोरे यांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सरचिटणीस आणि कर सल्लागार श्री राजेंद्र साळवी यांनी प्रास्ताविकात सांगितले की “हा उद्योजक मेळावा मंडळाच्या राजर्षी शाहू महाराज विचार मंचाने आयोजित केला असून, मंडळाचा ६४वा वर्धापनदिन ही यानिमित्ताने साजरा केला जात आहे “
१२५ वर्षापूर्वी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून व्यवसाय आणि शेती यांच्या भरभराटीकरिता रयतेभिमुख धोरणे बनवली. आजच्या काळात महाराष्ट्रात उद्योगस्नेही सरकारी धोरणे प्रत्यक्ष राबविणे अत्यंत गरजेचे आहे. उद्योजकांना पदोपदी होणारा जाच आणि त्रास नष्ट झाला पाहिजे, तरच इथे उद्योग व्यवसायासाठी आश्वासक वातावरण निर्माण होईल, मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री सरेशजी सुर्वे यांनी मराठा उद्योजक मेळाव्याचे उदिष्ट सांगून प्रत्येकाने आपला स्वतःचा उद्योग सुरू करावा नोकरदार न होता उद्योजक व्हावे आणि इतरांसाठी नोकरीच्या संधी निर्माण कराव्या असा सल्ला तरुणाईला दिला.
मंडळाच्या ‘उद्योजक विंग’ची उदघोषणा करताना त्यानी “मराठा तितुका मेळवावा, अवघा उद्योजक घडवावा” हे ब्रीदवाक्य उद्योजकांना दिले, “यापुढे AI म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे युग आहे. डिजिटल युग आहे. त्यामुळे त्याचे ज्ञान आत्मसात करून जगाबरोबर चालायला शिकले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.
डॉ. अमित बागवे यांनी मराठा समाजासाठी अर्थार्जनाचा वेगळा मार्ग या विषयावर बोलताना सांगितले की, मराठा समाज हा कर्मकांडात गुंतलेला आहे आणि त्यात बहमोल वेळ वाया घालवीत आहे, यातून बाहेर येऊन तरुणांनी उद्योग करण्याकरता स्वतः मधील विश्वास जाग्रुत करणे जरुरी आहे. हातात एखादी नोकरी किंवा व्यवसाय असेल तरी, एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत असणे आज निकडीचे झाले आहे, त्यासाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, उद्योगात पाय रोवून उभे राहिले पाहिजे. उद्योग नेहमीच दुस-यांच्या पैशांनी करावा. शेअर मार्केट मधून आपण चांगले भांडवल उभारू शकतो, त्यासाठी स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचा त्यांनी सल्ला दिला.
प्रमुख पाहुणे श्री हणमंतराव जगदाळे यांनी स्वतःचे उदाहरण देऊन सांगितले की, त्यांनी सरुवातीच्या काळात हातगाडी चालवली होती आणि फुटपाथवर झोपून दिवस काढले होते. काम कोणतेही असो ते लहान मोठे नसते, फक्त आयुष्यात मोठे होण्याची जबरदस्त इच्छा असावी लागते. काबाडकष्ट करण्याची तयारी असावी लागते, प्रामाणिकता असावी लागते. आजकाल व्यवसायात भरपूर अडचणी आहेत त्यावर मात करून पुढे जावे लागेल. ‘आयुष्यात तुमच्या मनाला डंख लागले तरच पंख पसरण्याचे बळ मिळते’ पुढे ते म्हणाले की, तरुणानी नाक्यांवर किंवा गावच्या तिठ्यावर बिनकामाने उभे राहून आयुष्यातील महत्वाचा कालावधी वाया घालवू नये, गल्लोगल्ली विविध उत्सव साजरे करण्यासाठी दकानदार, उद्योजक बांधकाम व्यावसायिक यांचेकडून ठराविक निधी गोळा केला जातो. हा त्याच्याकील एकप्रकारचा अन्यायच असतो. त्यांच्या घामाच्या कमाईवर असे उत्सव साजरे करण्यापेक्षा असे उत्सव साजरे करणान्यांनी स्वतःच्या खिशात हात घालून ते साजरे करावे.
‘मी उद्योजक होणारच’ या चळवळीचे प्रमुख श्री निलेश मोरे, उद्योजकाना संबोधित करताना म्हणाले की, पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त बरेच काही आपल्याला शिकायला पाहिजे, नव्हे पाठ्यपुस्तकातून बाहेर येऊन तुम्ही जगात मिसळलात, तरच आपली सर्वार्थाने उन्नती होऊ शकते. विविध क्षेत्रातील दिग्गजांना भेटून ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. लवकरच १०० कोटींचा उद्योग व्यवसाय करणा-या १०० मराठी उद्योजकांना घेऊन मुंबईच्या ‘ताजमहाल’ या पंचतारांकित होटेलमध्ये ते कार्यक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी त्यांना त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
रायगडमधील माजी आमदार श्री श्याम सावंत हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि मंडळाच्या या उपक्रमाला त्यांनी शभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डॉ. दिलीप पाटील माजी संचालक मुंबई विद्यापीठ व प्रेसिडेंट छत्रपती हायर एज्युकेशन फोरम, प्रशांत झिंगारे मॅनेजर, आयसीआयसीआय बँक, राम बागवे, डी के माळी, प्रेसिडेंट अखिल भारतीय माळी महासंघ, प्रवीण जाधव, आर्किटेक्ट डॉ. पांडुरंग भोसले, ऑस्कर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अजय काटे, पूनम पोवार, अॅड टी. डी. थोरात, अॅड. तनया साळवी, शेतकरी हॉटेलचे सूरज संकपाळ, बांधकाम व्यावसायिक अॅड दिपक सावंत, तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नारायण कदम यांनी केले
.
Arthsanket contact – 8082349822




