वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता
भारतातील वाहन उद्योग सध्या स्थानिक उत्पादन, पुढच्या पिढीचे मोबिलिटी प्लॅटफॉर्म्स आणि अधिकाधिक अत्याधुनिक उत्पादन प्रक्रियांच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर, मूळ वाहन उत्पादक आणि टियर-१ पुरवठादारांच्या बदलत्या गरजांना सक्षम पाठबळ देण्यासाठी गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या टूलिंग व्यवसायाने आपली अत्याधुनिक अभियांत्रिकी क्षमता आणि उत्पादन कौशल्ये मजबूत केली आहेत. कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी ८५ टक्क्यांहून अधिक व्यवसाय वाहन उद्योगाशी संबंधित आहे. कंपनी प्रवासी वाहने, दुचाकी, व्यावसायिक वाहने तसेच इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील ग्राहकांसोबत काम करत आहे. यासाठी उच्च अचूकतेची टूलिंग उत्पादने पुरवली जात आहेत. सध्या वाहन उद्योगासाठी कंपनी पुरवत असलेल्या ९५ टक्के टूलिंग उत्पादनांची निर्मिती उत्पादनांची निर्मिती भारतातच केली जाते. ही बाब स्वदेशी टूलिंग उद्योगाची क्षमता आणि गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेसारख्या उपक्रमांमुळे देशांतर्गत उत्पादनाला मोठी चालना मिळाली आहे. तसेच पुरवठा साखळी सक्षम आणि स्वावलंबी करण्यावरही भर दिला आहे. त्यामुळे अनेक उत्पादक कंपन्या आयतीवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक स्तरावर साहित्य आणि उपकरणांची खरेदी वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर गोदरेज एंटरप्रायझेस समूहाचा टूलिंग व्यवसाय विविध प्रकारच्या आधुनिक ट्रलिंग सोल्यूशन्सद्वारे सहकार्य करत आहे. यामध्ये प्रेस टूल्स, डाय कास्टिंग डायज आणि उच्च अचूकतेच्या टूलिंग प्रणालींचा समावेश आहे. या उपायांमुळे उत्पादक कंपन्यांना उत्पादनक्षमता वाढवणे, दर्जा सुधारणे आणि कामकाज अधिकतेने कार्यक्षम बनविण्यास मदत होत आहे. वाहन उद्योगाबरोबरच कंपनी औद्योगिक यंत्रसामग्री, रेल्वे, मेट्रो रेल आणि संरक्षण उत्पादन या क्षेत्रांनाही सेवा पुरवत आहे. त्यामुळे भारतातील उत्पादन क्षेत्र अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर करण्यासाठी कंपनी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगण्यात आले आहे.
गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या टूलिंग व्यवसायाचे प्रमुख पंकज अभ्यंकर म्हणाले, “भारतातील वाहन उद्योग बदलत आहेत. स्वदेशी उत्पादनाला मिळणारे प्रोत्साहन, आधुनिक मोबिलिटी तंत्रज्ञान आणि अधिक लवचिक उत्पादन प्रक्रियेची वाढती गरज यामुळे हा बदल घडत आहे. वाहनांच्या अत्याधुनिक रचना अचूकता प्रदान करत आहेत. दर्जेदार उत्पादन, अधिक उत्पादनक्षमता आणि कमी वेळेत नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी टूलिंगची भूमिका महत्त्वाची बनली आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि आधुनिक उत्पादन क्षमतांवर सातत्याने भर देत आहोत. त्याचबरोबर भारताला उत्पादन क्षेत्रात सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्दिष्टालाही आम्ही हातभार लावत आहोत.”
उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन गोदरेज एंटरप्रायझेस समूहाचा टूलिंग व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करत आहेत. यामध्ये डिजिटल सिम्युलेशन, अडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित देखरेख प्रणाली आणि मोठ्या क्षमतेच्या डाय कास्टिंग आणि कॉन्फॉर्मल कूलिंग सोल्यूशन्स यांसारख्या विशेष उत्पादन तंत्रज्ञानाचाही वापर करत आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनाची गुणवत्ता चांगली ठेवणे, उत्पादनक्षमता वाढवणे, कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करणे शक्य होत असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.
येत्या काही वर्षांत भारतातील टूलिंग उद्योगात सातत्याने वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वाहन उत्पादन, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील वाढत्या गुंतवणूकीमुळे या उद्योगाला चालना मिळणार आहे. याशिवाय अनेक उत्पादक कंपन्या आता स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर देत आहेत. नवीन पिढीची उत्पादने विकसित करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे विविध उद्योगांमध्ये उच्च अचूकतेच्या अभियांत्रिकी टूलिंग सोल्यूशन्सची मागणी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
वाहन उद्योग, रेल्वे, मेट्रो पायाभूत सुविधा, संरक्षण उत्पादन आणि औद्योगिक अभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये सातत्याने वाढणा-या गुंतवणूकीच्या पार्श्वभूमीवर गोदरेज एंटरप्रायझेस समूह स्वदेशी टूलिंग क्षमतांना अधिक बळकटी देण्यावर भर देत आहे. कंपनी आधुनिक आणि उत्कृष्ट उत्पादन प्रक्रियेचा सातत्याने विकास करत आहे. तसेच भारतीय उत्पादन क्षेत्र सक्षम, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर प्रभावी बनविण्यासाठीही कंपनी काम करत आहे. भारताला जागतिक दर्ज्याचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्दिष्टाला हातभार लावण्याचा कंपनीला प्रयत्न असल्याचे कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.


