पुणे महापालिका–लाईटहाऊसचा रोजगारनिर्मितीचा विक्रम

पुणे महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लाईटहाऊस प्रकल्पाच्या यशस्वी १० वर्षांच्या प्रवासाचा दशकपूर्ती सोहळा दिनांक २७ जुलै २०२६ रोजी , गणेश कला क्रीडा सभागृह येथे  उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दशकात पुण्यातील ५०,००० हून अधिक युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांपैकी २५,००० हून अधिक युवक-युवतींना रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या उपलब्ध करून देण्यामध्ये  महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व शासकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील भागीदारांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर मा. श्री. परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष मा. श्री. श्रीनाथ भिमाले, माजी खासदार मा. वंदना ताई चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (विशेष) मा. श्री. ओमप्रकाश दिवटे,अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) मा. श्री. प्रजित नायर भा.प्र.से, समाज विकास विभागाच्या उपआयुक्त सौ. आशा राऊत, मा. श्री. अजय खेडेकर,संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) तथा नगरसेवक, पुणे म.न.पा., सौ. अनुपमा पवार,उपआयुक्त, कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र राज्य,  स्थायी समिती सदस्य तथा नगरसेविका सौ. रुपाली दिनेश धाडवे, सौ. ऐश्वर्या थोरात,नगरसेविका, लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे चेअरमन श्री. गणेश नटराजन, सह-संस्थापक सौ. रुची माथूर, तसेच लाईटहाऊसचे ७०० हून अधिक माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उपमहापौर मा. श्री. परशुराम वाडेकर म्हणाले, “भारताच्या भावी कार्यशक्तीचे भविष्य केवळ युवकांना दिल्या जाणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणावर अवलंबून नाही, तर त्यांच्या आत्मविश्वास, बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि त्यांच्या आकांक्षांना योग्य दिशा देण्यावरही अवलंबून आहे. प्रत्येक युवकामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असून त्यांच्या स्वप्नांना बळ देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

स्थायी समितीचे अध्यक्ष मा. श्री. श्रीनाथ भिमाले म्हणाले, “रोजगारक्षम कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून युवकांना सक्षम बनविण्याचे कार्य लाईटहाऊस प्रकल्प प्रभावीपणे करत आहे. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना संधीच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आपले सामूहिक ध्येय आहे.”

या दशकपूर्ती सोहळ्यात आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासातून जिद्द, योग्य करिअर निवड आणि सातत्यपूर्ण प्रगतीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पुण्यातील युवकांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे शासकीय भागीदार, १५ हून अधिक अर्थसहाय्य (CSR ) करणाऱ्या संस्थांचा विशेष सत्कार करण्यात आला.

२०१६ मध्ये औंध येथील पहिल्या लाईटहाऊस केंद्रापासून सुरू झालेला हा प्रवास आज देशातील ७ राज्यांतील १७ शहरांमध्ये कार्यरत ५१ लाईटहाऊस केंद्रांपर्यंत विस्तारला आहे. आजपर्यंत या उपक्रमाने ९०,००० हून अधिक युवक-युवतींपर्यंत पोहोचून त्यांपैकी जवळपास ५०,००० युवक-युवतींना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *