सहावा जागतिक मराठी उद्योजकता दिवस उत्साहात साजरा I

सहावा जागतिक मराठी उद्योजकता दिवस उत्साहात साजरा I

कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंती दिनानिमित्त ‘जागतिक मराठी उद्योजकता दिवस’ साजरा करण्यात येतो.

सन २०१९ साली कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या १५० व्या जयंती दिनानिमित्त जागतिक मराठी उद्योजकता दिवस ही संकल्पना ‘मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती’ व वाशी येथील ‘मराठी साहित्य संस्कृती कला मंडळच्या’ वतीने पहिल्यांदा मराठी उद्योजक समाजात निर्माण करण्यात आली. यानंतर कोरोनाच्या सलग दोन वर्षात जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह सुद्धा व्यावसायिक एकीकरण समिती आणि अर्थसंकेत या दोन संस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला. ज्यात महाराष्ट्राचे तत्कालीन माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, माननीय उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर सौ किशोरी पेडणेकर, यांच्यासोबत महाराष्ट्रातले आणि परदेशातील अनेक मराठी उद्योजक आणि उद्योजकीय संस्था सामील झाल्या होत्या. यानंतर २० जून रोजी जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला. यंदा या संकल्पनेचे सहावे वर्ष होते.

यावर्षी पुन्हा एकदा वाशी येथील मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, अर्थसंकेत व युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थांनी यावर्षीचा सहावा जागतिक मराठी उद्योजकता दिवस दिनांक २० जून २०२४ गुरुवार रोजी साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. ज्यात मराठी मंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री सुभाष कुलकर्णी व श्री निलेश पालेकर, अर्थसंकेतच्या वतीने संस्थापक डॉ. अमित बागवे आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने श्री मंदार नार्वेकर यांनी विशेष योगदान दिले. यावर्षीचा जागतिक मराठी उद्योजकता दिवस हा “सोहळा मराठी उद्योजकांचा – यशस्वी भव:” या टॅगलाईनच्या नावाने साजरा करण्यात आला. यावर्षीच्या कार्यक्रमात ‘मराठी माणूस आर्थिक उन्नतीकडे’, ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यवसाय वाढीसाठी वापर’ आणि ‘मी यशस्वी उद्योजक होणारच’ असे तीन मुख्य विषयांवर मार्गदर्शन होणार होते. याशिवाय दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन हा विषय सुद्धा सामील केला गेला होता.

Dr Amit Bagwe
Dr Amit Bagwe

सदर कार्यक्रम मराठी मंडळाच्या सभागृहात ठीक पाच वाजता सुरू झाला सदर कार्यक्रमाला डॉ. अमित बागवे डॉ. श्री उमेश कणकवलीकर आणि श्री जोतीराम सपकाळ हे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांच्या तसेच मराठी मंडळाचे अध्यक्ष श्री कुलकर्णी सर यांच्या हस्ते, प्रथम दीप प्रज्वलन आणि त्यानंतर श्री शिवप्रतिमा व कै. किर्लोस्कर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री कुलकर्णी सर यांच्या हस्ते सर्व मान्यवर मार्गदर्शक वक्ते यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि सर्वप्रथम “मराठी माणूस आर्थिक उन्नतीकडे” या विषयावर डॉ अमित बागवे यांनी उत्तम प्रेझेंटेशन सादर करून बहुमूल्य मार्गदर्शन केले. मराठी माणसाला आर्थिक उन्नतीकडे जाण्यासाठीचे अनेक मार्ग जसे की पीपीएफ, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, गोल्ड इत्यादी. त्यांनी सोप्या व सुलभ भाषेत उलगडून सांगितले.

Jotiram Sapkal
Jotiram Sapkal

यानंतर “आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर” या विषयावर तरुण तडफदार मराठी उद्योजक व डिजिटल तंत्रज्ञान तज्ञ श्री जोतीराम सपकाळ यांनी ‘ए आय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट जीपीटी इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर प्रेझेंटेशन दिले आणि उपस्थितांना अवघड विषय सोपा करून दाखवत सदर तंत्रज्ञान वापरून आपण आपला व्यवसाय कसा मोठा आणि आर्थिक फायदा करून देणारा करू शकतो याबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले.

Dr Umesh Kankavlikar
Dr Umesh Kankavlikar

यानंतर सर्वांनाच ज्याची उत्सुकता होती, तो “मी यशस्वी उद्योजक होणारच” हा विषय डॉ श्री उमेश कणकवलीकर यांनी त्यांच्या “मी विजेता होणारच” या कार्यक्रमाच्या तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा अनुभव पणाला लावत अनेक उत्तम उत्तम अशी उदाहरणे, सुविचार, शेरोशायरी, कविता, गाणी सादर करून उपस्थित उद्योजकांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकले. डॉ कणकवलीकर यांनी आपल्या परखड शैलीत सर्वांच्याच मनात यशस्वी आयुष्याचा मंत्र रुजवला. त्यांनी सर्व उपस्थितांना हात वर करून ‘मी विजेता होणारच’ अशी शपथही घ्यायला लावली. या तीनही मार्गदर्शक वक्त्यांच्या मार्गदर्शनाला सर्व उपस्थितांनी जोरदार टाळ्या आणि घोषणा देऊन जबरदस्त असा प्रतिसाद दिला.

Subhash Kulkarni
Subhash Kulkarni

कार्यक्रमाच्या शेवटी मराठी मंडळाचे अध्यक्ष श्री कुलकर्णी सर यांनी मराठी समाजाला या अशा कार्यक्रमांची आणि संकल्पनांची गरज असल्याचे आणि त्यासाठी मराठी मंडळ नेहमीच सहकार्य करण्यात पुढाकार घेईल असे आपले मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेंबर ऑफ कॉमर्स संचालक श्री मंदार नार्वेकर यांनी केले. सूत्रसंचालनाच्या दरम्यान त्यांनी सदर संकल्पनेची निर्मिती, सदर संकल्पनेच्या मागची शुद्ध भावना, विचार उपस्थितांसमोर मांडले. श्री मंदार नार्वेकर आणि डॉ अमित बागवे यांनी हा दिवस साजरा करताना, सर्व मराठी उद्योजक तसेच सर्व मराठी उद्योजकीय संस्थांनी एक जागतिक दर्जाचे व्यासपीठ निर्माण करून एकत्र यावे, त्याद्वारे जगभरातील मराठी उद्योजकांनी, प्रचंड नाव, पद, प्रतिष्ठा, पैसा, यश कमवावे आणि मराठी समाजाची सुद्धा उद्योजकतेमध्ये स्वतःची लॉबी निर्माण करावी. मोठ्यात मोठ्या ते लहानातल्या लहान उद्योजकांपर्यंत ही संकल्पना कशी पोहोचवावी व त्या प्रत्येकाला सदर दिवस आपल्या प्रत्येक मराठी माणसाचा स्वतःचा सण असल्याप्रमाणे साजरा करण्यासाठी याबद्दल मार्गदर्शन आणि आवाहन केले.

Mandar Narvekar
Mandar Narvekar

यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनीच एकमेकांसोबत तसेच मान्यवर वक्त्यांसोबत ओळख तसेच काही विषयांवर चर्चा केली. सर्वांनीच सदर कार्यक्रमाच्या आयोजनावर पसंती दर्शवली आणि समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व उद्योजकांनी एकूणच या संकल्पनेच्या गरजेवर शिक्कामोर्तब केले. पुढील वर्षापासून सदर जागतिक मराठी उद्योजकता दिवस अधिकाधिक भव्यतेने आणि व्यापकतेने साजरा करण्यासाठी प्रत्येकाने आपापला सहभाग देण्याचे आयोजकांना नक्की केले. सदर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्व संस्थांनी, डॉ उमेश कणकवलीकर यांच्यासोबत मिळून महाराष्ट्र शासनाकडून सदर २० जून चा दिवस हा ‘अधिकृतरित्या जागतिक मराठी उद्योजकता दिवस’ म्हणून साजरा करण्यासाठी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करण्याचे देखील सर्वानुमते ठरवले. यासाठी जास्तीत जास्त मराठी उद्योजकांनी आणि उद्योजकीय संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन आयोजक यांनी केलेले आहे.

Jagtik Marathi Udyojkata Diwas
Jagtik Marathi Udyojkata Diwas

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3

शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT

18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *