महागाईचा भस्मासुर – डॉ अमित बागवे (संपादक अर्थसंकेत) बी कॉम, एम कॉम, एम ए मराठी, एम ए संस्कृत (मुंबई विद्यापीठ)
महागाईचा भस्मासुर – डॉ अमित बागवे
एप्रिलमधील महागाई दर आठ वर्षांचा उच्चांक गाठणारा ठरला आहे. ७.७९ टक्के इतका महागाई दर नोंदला गेला आहे. खाद्य महागाई दरही ८.३८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. संपूर्ण २०२२ या वर्षात किरकोळ महागाई दर सहा टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०१२ मध्ये अंदाजे रु.८५०/- मध्ये किराणा माल येत असे तोच किराणा आज २०२२ मध्ये खरेदी करण्यासाठी रु. १६००/- खर्च होत आहेत. खाद्यतेल, गॅस, डाळी, भाजीपाला आणि गहू – तांदळाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. सर्वसामान्यांचे रोजचे जगणे दिवसेंदिवस खडतर होत चालले आहे. सरकारी कर्मचारी सोडले तर कोणाचेच उत्पन्न वाढण्याचे चिन्ह दिसत नाही. कोरोनामुळे भरडून निघालेला सर्वसामान्य माणूस महागाईच्या खोल दरीत लोटला जात आहे.
भारतात शहरी भागातील बेरोजगारीचा दर गेल्या वर्षांतील ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ८.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै-सप्टेंबर २०२१ मध्ये १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी बेरोजगारीचा दर शहरी भागात ९.८ टक्के होता. वाढत्या बेरोजगारीमुळे सामाजिक अशांततेचे प्रश्न निर्माण होत आहेत.
रशिया युक्रेन युद्धाच्या पाश्र्वभूमीवर जागतिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे वाढलेल्या महागाईला लगाम घालण्यासाठी व्याजदरवाढीचे पाऊल उचलले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले आहेत. तसेच अमेरिकच्या फेडरल रिझर्व्हने सुद्धा व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. जगातील इतर देशातसुद्धा व्याजदर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. व्याजदर वाढविल्यामुळे व्यवहारातील रोकड कमी होईल. जागतिक पातळीवरसुद्धा कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता अगदीच धूसर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई भडकत राहणार आहे. इंडोनेशियामध्ये पाम तेलाचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि वाढत्या महागाईमुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. प्रति डॉलर पहिल्यांदाच रुपया ७७.५० पातळीच्या खाली घसरला आहे. शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण सुरु आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदार यामुळे पोळला जातो आहे. नोकरीचे आणि व्यवसायातले उत्पन्न वाढत नाही आणि गुटनवुकीवरचा परतावा कमी होत आहे किंवा मिळत नाही आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व झटपट श्रीमंतीच्या विविध फसव्या योजना सामान्यांचे आर्थिक नुकसान करतच आहेत.
हा महागाईचा भस्मासुर दिवसेंदिवस मोठा होत आहे आणि लवकरच तो सर्वसामान्यांना जाळून टाकणार आहे असे दिसत आहे. आता आपल्याला आपले मासिक उत्पन्न कसे वाढेल याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. इतर समाजांच्या मानाने मराठी समाजात आर्थिक संपन्नता फारच कमी आहे. त्यामुळे मराठी समाजाने आपल्या आर्थिक उन्नतीकडे लक्ष देऊन त्यासाठी एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने कार्य करायला हवे. प्रत्येकाला आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य समृद्ध कसे होईल हे समजते. सुज्ञास सांगणे न लगे !
arthsanket10@gmail.com
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo