सुरेल मैफिल – हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्सच्या शंभरी निमित्त संगीतसंध्या संपन्न I
सुरेल मैफिल – हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्सच्या शंभरी निमित्त संगीतसंध्या संपन्न I
आम्ही काल ५ जानेवारी २०२५ ला एक अप्रतिम कार्यक्रम अनुभवला, सुरेल मैफिल रंगली होती आणि कार्यक्रम त्या कंपनीच्या १०० वर्षाच्या कार्याला अगदी साजेसा होता.
संपूर्ण वातावरण अगदी स्वरमग्न झालं होतं. त्या ४ तासाच्या कार्यक्रमामध्ये फक्त स्वर नाचत होते, गात होते आणि अभिनय देखील करत होते.
“जादूची पेटी” खरच जादूची पेटी होती. श्री. सत्यजित प्रभू यांनी पियानोवर तर आदित्य ओक यांनी हार्मोनियमचे सूर धरुन त्यांच्या जादूई बोटांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. इतर वेळेस जेव्हा आपण कोणत्याही संगीताच्या कार्यक्रमाला जातो, तेव्हा आपण धरून चालतो कि, तिथे मुख्यरुपात गायक तर असतीलच आणि त्यांना साथ देणारे इतर कलाकार किंवा वादक असतील. पण कालचा कार्यक्रम तसा नव्हता, तिथे सेन्टर स्टेजला वादक मंडळी होती आणि त्यांनीच संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या कलेने आणि ‘हरिभाऊ विश्वनाथ’ यांनी बनवलेल्या वाद्यांनी खुलवला.
हार्मोनियम (पेटी ) आणि पियानोच्या जादू नंतर वेळ होती, ती ढोलकीच्या तालाची. श्री. निलेश परब आणि श्री. कृष्णा मुसळे यांच्या ढोलकीवरची जुगलबंदीने कार्यक्रमात नवा रंग भरला. कार्यक्रमाचे अतिथी होते विख्यात संगीतकार श्री.अशोक पत्की आणि श्री. कौशल इनामदार. त्यांच्या मनोगतात श्री. पत्की यांनी संगीतातल्या करिअरची सुरुवात कशी झाली, ह्याचा सुंदर किस्सा सांगितला. जेव्हा त्यांनी ठरविले कि, त्यांना संगीत शिकायचे आहे, तेव्हा त्यांनी त्यांची धाकटी बहीण मीना यांच्याकडून काही पैसे घेतले आणि स्वतःकडचे काही पैसे गोळा केले, ते मिळून ३६.५ रुपये इतके झाले होते, ते घेऊन ते हरिभाऊ विश्वनाथ ह्या पेटी आणि इतर वाद्ये असलेल्या दुकानात गेले. तिथे त्यांना एक पेटी आवडली, त्याचा दर तेव्हा ५० रुपये इतका होता, त्यांच्याकडे पैसे कमी पडत होते, त्यांनी विचारले सेकंडहॅन्ड पेटी मिळेल का ? किंवा दुसरी कोणती तरी स्वस्तातली पेटी आहे का ? काहीच नव्हे तर ट्रेन मध्ये जे गातात तशी तरी पेटी मिळेल का ? ह्या सगळ्याला उत्तर ‘नाही’ असे होते. मग ते हताश मनाने त्या दुकानाची पायरी उतरू लागले, तितक्यात पाठून आवाज आला “घेऊन जा ती पेटी” तेव्हा पत्की यांचा आनंद गगनात मावेना इतका झाला. हरिभाऊ विश्वनाथ कंपनी यांच्या माणुसकीमुळे आज आपल्याला श्र. अशोक पत्की आणि इतर अनेक कलाकार मिळाले. तसेच श्री. कौशल इनामदार यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात पहिली पेटी देखील हरिभाऊ विश्वनाथ यांच्याकडूनच घेतल्याचे सांगितले. तसेच ती आजतागायत कायम त्यांच्यासोबत असते. त्याचसोबत पंडित शिवकुमार शर्मा यांचे चिरंजीव पंडित राहुल शर्मा यांनी संतूरच्या तारा छेडल्या तर श्री. ओजस अधिया यांनी तबल्यावर ताल धरला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विघ्नेश जोशी यांनी सुंदररित्या सांभाळले.
हरिभाऊ विश्वनाथ हे संगीत विश्वातले एक विख्यात नाव. मुंबई – महाराष्ट्रातील तसेच जगभरातील प्रत्येक संगीत प्रेमीचे आणि कलाकाराची पहिली पसंत म्हणजे ‘हरीभाऊ विश्वनाथ’ यांची वाद्ये. शंकर महादेवन ते अवधूत गुप्ते अशा सर्वच गायकांचे आणि संगीतकारांचे आवडते आणि हक्काचा ब्रँड म्हणजे ‘हरिभाऊ विश्वनाथ’.
१९२५ साली सुरु झालेले हे दुकान आज १०० वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण करत लाखो कलाकारांच्या यशाचे सोबती झाले आहेत. अतिशय बारकाईने प्रत्येक पेटी बनवली जाते. तज्ज्ञ मंडळी आणि उत्कृष्ट कारिगर मंडळी ह्यासाठी काम करतात. तीन पिढ्यांचा हा दिवाणे कुटुंबीयांचा पेटी आणि इतर वादकांचा हा व्यवसाय फक्त एक व्यवसाय नसून माणुसकी आणि कला आणि कलाकारांना जपणारं एक शंभर वर्षीय वटवृक्ष आहे आणि त्याच्या फांद्या ह्या कलाकार असून फळं हे त्यातून उत्पन्न झालेलं सुंदर संगीत आहे.
शतक महोत्सवाचा त्यांचा हा कार्यक्रम सर्व दिवाणे कुटुंबीय आणि सर्व संगीतप्रेमीनी, कलाकारांनी अगदी आनंदात दिमाखदाररित्या साजरा केला. त्यांच्या ह्या माणुसकीच्या व्यवसायाची वाटचाल अशीच अनेक वर्ष चालू दे आणि दिवाणे कुटुंबियांच्या अनेक पिढ्या हे काम वाढवु दे आणि त्यात वृद्धी होउ दे हि सदिच्छा.
शब्दांकन : सौ रचना लचके बागवे, रचना आर्टस् अँड क्रीएशन्स
- सुरेल मैफिल – हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्सच्या शंभरी निमित्त संगीतसंध्या संपन्न I
- महिंद्रा लाइफस्पेसेसतर्फे महिंद्रा खराडी अनेक्स, पुणे येथे महिंद्रा आयव्हीलश लाँच I
- हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स : शतकानिमित्त विशेष कार्यक्रम I
- मला भावलेले डॉ मनमोहन सिंग – देवेंद्र भुजबळ
- महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉन्क्लेव्ह पर्व ४ संपन्न !