शेअर बाजारातील घसरण – फायदेशीर असते ! डॉ. अमित बागवे – संस्थापक ‘अर्थसंकेत’
शेअर बाजारातील घसरण – फायदेशीर असते ! डॉ. अमित बागवे – संस्थापक ‘अर्थसंकेत’
घसरणीमुळे सुद्धा होते शेअर वायदे बाजारात करोडो अरबो रुपयांची कमाई !
शेअर बाजार कोसळला कि करोडो अरबो रुपये बुडाल्याच्या बातम्या (अफवा) पसरविण्याचे काम तथाकथित प्रस्थापित प्रसामाध्यमं करीत असतात.
जर खरंच अशा प्रकारे एका दिवसात करोडो अरबो रुपयांची होळी होत असेल, तर मग दररोज इतके पैसे घेऊन लोकं शेअर बाजारात येतात कसे ? या प्रश्नाची उकल सामान्य माणसांना अजून झालेली नाही !
अपप्रचार करणाऱ्यांचे सामान्य ज्ञान किती अतिसामान्य आहे हे यातून दिसून येते. अकलेची दिवाळखोरीचं म्हणायची आणि काय ? थोडक्यात काय खोटं बोला आणि रेटून बोला, म्हणजे सामान्यांच्या मनात कायमस्वरूपी भीती निर्माण होईल.
शेअर बाजाराची घसरण का होते ? कशी होते ? त्यामागची कारण मीमांसा काय ? त्याचे परिणाम काय ? अशा सहज साध्य प्रश्नांची उत्तरे सुद्धा या तथाकथित प्रस्थापित प्रसामाध्यमाना देता येणार नाहीत !
मुळात हि प्रसारमाध्यमं चालवणारी सुद्धा एक कंपनीचं असते व ती सुद्धा शेअर बाजारात नोंदणीकृत असते. जर अशा प्रकारे करोडो अरबो रुपयांची होळी होत असेल, तर मग या कंपन्या बंद पडून हि प्रसारमाध्यमं देशोधडीला का लागत नाहीत ? असा प्रश्न सुद्धा सर्वसामान्यांना पडतो. खरंच !
शेअर बाजरात होणारी शेअर्सची खरेदी विक्री हि सर्वसामान्यपणे होणाऱ्या कोणत्याही व्यवसायाप्रमाणे होत असते. जसे कि भाजी मार्केट मध्ये भाजी विकत घेणे आणि विकणे किंवा कपडे बाजारातील कपडे विकत घेणे आणि विकणे. म्हणजेच जर हा व्यवसाय असेल, तर एकाचा फायदा आणि दुसऱ्याचा तोटा हे गणित तर पक्के आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात हे गणित असेच चालेल नाही का !
खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे नफा अथवा तोटा ! हे सामान्य गणित अगदी लहान मुलांनासुद्धा कळते, नाही का !
म्हणजेच काय, “कमी किंमतीला बनविले अथवा विकत घेतले व जास्त किंमतीला विकले कि होतो तो नफा” !
किंवा “बनविण्याच्या अथवा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर होतो तो तोटा” ! बरोबर ना !!
हे साधे सरळ व्यवहाराचे गणित आहे. म्हणजेच खरेदी आणि विक्रीचा व्यवहार पूर्ण होणे आवश्यक आहे.
एक खरेदी व एक विक्री म्हणजे एक संपूर्ण व्यवहार ! तसेच नफा होण्यासाठी विक्रीची किंमत जास्त असणे आवश्यक आहे.
मग यात ‘आधी विकत घ्या आणि नंतर विका’ किंवा ‘आधी विका आणि नंतर किंमत कमी झाली कि विकत घ्या’. विक्रीची किंमत जास्त असली कि नफा होणार आणि विक्रीची किंमत कमी असली तर तोटा !
शेअर बाजार हि अशी जागा आहे जिथे खरेदी विक्रीचा व्यवहार हा गँरंटीड असतो. म्हणजेच शेअर्स खरेदी केले तर आपल्या खात्यातून पैसे नक्की वजा होणार व शेअर्स आपल्याकडे येणार व शेअर्स विकले तर शेअर्स आपल्याकडून जाणार व पैसे आपल्या खात्यात जमा होणार. हा खात्रीशीर व्यवहार आहे. शेअर्स आणि पैशांची देवाणघेवाण खात्रीशीररीत्या होणारच ! म्हणजेच हा जगातील सर्वात पारदर्शी असा व्यवहार आहे, असेही म्हणावे लागेल. कारण इतर कुठल्याही व्यवहारात अशा प्रकारची खात्री कोणीही देऊ शकतचं नाही !
तर मग पुन्हा एकदा येऊया शेअर बाजरातील घसरण – फायदेशीर असते या विषयाकडे !
जसे आपण बघितले कि विक्री किंमत हि खरेदी किंमतीपेक्षा जास्त असली कि नफा होतो व शेअर बाजरातील प्रत्येक व्यवहार हा गॅरन्टीड असतो.
त्याचप्रमाणे हा संपूर्ण व्यवहार कम्प्युटर द्वारे अथवा सिस्टम द्वारे होत असल्यामुळे यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते. नियंत्रण म्हणजेच व्यवहार पूर्ण करण्यासाठीची खात्री. नियंत्रण म्हणजे गैरवापर या अर्थी नव्हे !
कम्युटर अथवा सिस्टमद्वारे व्यवहार होत असल्यामुळे व्यवहार पूर्ण करणे हे महत्वाचे असते. आधी खरेदी करून नंतर विक्री करणे अथवा आधी जास्त किंमत असताना विक्री करून नंतर किंमत कमी झाली कि खरेदी करणे. महत्वाचे म्हणजे व्यवहार पूर्ण करणे.
आधी किंमत जास्त असताना विक्री करणे हा प्रकार मूळ शेअर्स मध्ये फक्त एका दिवसासाठीच होतो व दिवस संपताना शेअर्स विकत घेऊन व्यवहार पूर्ण करावा लागतो. (यालाच शॉर्ट सेलिंग असे म्हणतात). या प्रकारात आपल्याकडे शेअर्स नसताना होणाऱ्या घसरणीचा फायदा घेण्यासाठी शेअर्स विकण्याची तरतूद केलेली असते परंतु दिवसाखेर शेअर्स विकत घेऊन व्यवहार पूर्ण करावा लागतो.
आपल्याकडे शेअर्स नसताना ते विकणार कसे असा प्रश्न सामान्य माणसांना नक्की पडतो. परंतु हा एक व्यवहार आहे व खरेदी तसेच विक्री या दोन व्यवहाराच्या बाजू आहेत. त्या दोन बाजू पूर्ण झाल्या कि व्यवहार पूर्ण होतो. म्हणजेच “आधी खरेदी करून नंतर विक्री करणे” अथवा “आधी विक्री करून नंतर खरेदी करणे”
शेअर्स नसताना शेअर्स विकण्याच्या या तरतुदीमुळे शेअर बाजारात जुन्या जमान्यात काही चुकीचे प्रकार घडले व शेअर्स विक्री करून पुन्हा खरेदी करण्याला फक्त एका दिवसात व्यवहार पूर्ण करण्याची मुदत ठेवण्यात आली. जर एखाद्याने हा व्यवहार पूर्ण केला नाही तर स्टॉक एक्सचेंज हा व्यवहार पूर्ण करते व त्यासाठी दंड आकारते. त्यामुळे व्यवहार पूर्ण होण्याची खात्री मिळते.
चुकीचे प्रकार घडत असल्यामुळे थेट शेअर्स मध्ये हे व्यवहार न करता त्याचे वायदे म्हणजेच करार करण्यात आले. हा करार एका महिना, दोन महिना किंवा तीन महिन्यांसाठी करता येतो. म्हणजेच दोन माणसांमध्ये शेअर्सची अदलाबदल न होता, त्या ऐवजी फक्त शेअर्स खरेदी विक्रीसाठीचा करार करण्यात येतो.
जर खरेदीचा करार केला असेल व शेअर्सची किंमत वाढली तर नफा आणि जर विक्रीचा करार केला असेल आणि किंमत घसरली तर नफा ! म्हणजेच विक्री किंमत हि खरेदी किंमतीपेक्षा जास्त असेल तर नफा !
वायदे बाजरामुळे शेअर बाजरात खरेदी विक्रीचे व्यवहार वाढले. शेअर बाजरात तेजी अर्थात वाढ होत असेल तर खरेदीचा करार करून नफा कमविला जातो व शेअर बाजरात मंदी अर्थात घसरण होत असेल तर विक्रीचा करार म्हणजेच वायदा करून नफा कमविला जातो. म्हणून शेअर बाजारातील घसरण हि फायद्याची असते. त्यांच्यासाठी ज्यांनी आधीच जास्त किंमत असताना विक्रीचे करार करून ठेवले आहेत. कारण त्यांनी जास्त किंमत असतानाच विक्री करून ठेवली आहे व शेअर्स स्वस्त होण्याची वाट बघत आहेत. शेअर बाजारात घसरण झाली कि ते स्वस्त शेअर्स विकत घेऊन “व्यवहार पूर्ण करतात” व नफा कमवितात.
ज्याप्रमाणे आपण सुरुवातीलाच बघितले कि हा एक व्यवहार आहे. म्हणजेच एक खरेदीकर्ता व एक विक्रीकर्ता असेल तरच हा व्यवहार पूर्ण होऊ शकतो. तसेच विक्री किंमत जास्त असेल व खरेदी किंमत कमी असेल तर नफा होतो. थोडक्यात एकाचा नफा तर दुसऱ्याचा तोटा !
त्यामुळे करोडो अरबो रुपये बुडाले अथवा त्यांची होळी झाली असे म्हणणे किती संयुक्तिक आहे ? जसे सुरुवातीलाच म्हटले आहे कि जर अशा प्रकारे करोडो अरबो रुपयांची होळी होत असती तर शेअर बाजार कधीच बंद पडले असते. कारण, लोकांकडे पैसे छापायची मशीन नाही आहे, की ते रोज नवीन पैसे छापतील व शेअर्स मध्ये व्यवहार करतील.
शेअर बाजाराचा अभ्यास दोन प्रकारे केला जातो. एक म्हणजे फंडामेंटल अर्थात मूलभूत विश्लेषण व दुसरा टेक्निकल अर्थात तांत्रिक विश्लेषण.
तांत्रिक विश्लेषण या अभ्यास प्रकाराचा वापर करून आधीच्या दिवसांच्या चार्टचा अभ्यास करून शेअर बाजारात वाढ होणार कि घसरण होणार याचा अंदाज बांधला जातो. त्यामुळे शेअर बाजारात वाढ होणार असे वाटत असेल तर खरेदीचा व्यवहार अथवा करार केला जातो व शेअर बाजारात घसरण होणार असे वाटत असेल तर विक्रीचा व्यवहार अथवा करार केला जातो.
म्हणूनच शेअर बाजारातील घसरणसुद्धा – फायद्याची असते !
‘भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे’ हे शेअर मार्केटवरील सर्वाधिक खपाचे पुस्तक डॉ अमित बागवे यांनी लिहिले आहे. तसेच ‘ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे’ हे शेअर मार्केट ट्रेडिंगवरील त्यांचे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. अधिक माहितीसाठी ८०८२३४९८२२