महाराष्ट्र एक्सेलन्स अवॉर्डने अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांचा सत्कार

महाराष्ट्र एक्सेलन्स अवॉर्डने अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, आमदार श्री. प्रसाद लाड व अभिनेता संतोष जुवेकर यांची विशेष उपस्थिती

“संघर्ष कधीही संपत नाही, मिळणाऱ्या यशासोबत तो सुसह्य होत जातो” – डॉ. अमित बागवे

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इथे झालेल्या ‘मी उद्योजक होणारचं’ कार्यक्रमात हावरे बिल्डर्सचे डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांचा महाराष्ट्र एक्सेलन्स अवॉर्डने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, आमदार श्री. प्रसाद लाड व अभिनेता संतोष जुवेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून १,००० हुन अधिक उद्योजक उपस्थित होते.

मराठी माणूस हा विविध क्षेत्रात आघाडीवर असून उद्योग क्षेत्रात देखील तो अग्रेसर आहे. एरवी इतर ठिकाणी आयोजित करण्यात येणारा हा सोहळा यंदा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये आयोजित करण्यात आला, यावरुनच मराठी माणसाची झेप आपल्याला दिसून येते. मराठी उद्योगाची पाटी दुकानावर लावून भागणार नाही तर त्यामागे व्यवसाय करणारा उद्योजक देखील मराठी असायला हवा. मराठी उद्योजक वाढावे यासाठी मराठी माणसाने मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे अशी अपेक्षा यावेळी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या व्यासपीठावरून बोलताना अमित बागवे यांनी सहज आणि ओघवत्या भाषेत उद्योजकांना मार्गदर्शन केले. २०१६ साली अर्थसंकेतने पहिल्यांदा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये मराठी उद्योजकांसाठी कार्यक्रम केल्याचे व १००० उद्योजकांना बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये आणण्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी माणूस १०० वर्षांहून अधिक काळ उद्योग व्यवसाय करत आहे. चितळे, पितांबरी, बेडेकर, विको, वामन हरी पेठे अशा उद्योजकांना अर्थसंकेतने ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१८ व २०१९ साली बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये आणले अशी आठवण सुद्धा त्यांनी सांगितली. थोर मराठी माणसांनी महाराष्ट्र घडवला आहे. मराठी माणूस नुसता प्रामाणिकच नाही तर पराक्रमी सुद्धा आहे. नाना शंकरशेट यांचा मुंबई घडविण्यात तर महाराज सयाजीराव गायकवाड व त्यांच्या कुटुंबाचा गुजरात राज्यात मोलाचा वाटा असल्याचे अमित बागवे यांनी सांगितले.

शेअर मार्केट मध्ये दीर्घ मुदतीसाठी गुतणवूक करून श्रीमंत होता येते. ट्रेडिंग पासून लांब राहावे असेही त्यांनी सांगितले. गेली ९८ वर्षे मराठी भाषेचे साहित्य संमेलन भरत आहे. जगभरात अशा प्रकारचे इतकी वर्षे इतर कुठल्याही भाषेचे संमेलन भरत असल्याची नोंद मिळत नाही. सोशिअल मीडिया व चित्रपटातून इतिहासाची फक्त तोंडओळख होते. संपूर्ण इतिहास कधीही कळत नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागतो, असेही अमित बागवे यांनी सांगितले.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या एस एम ई लिस्टिंगच्या माध्यमातून लघु व मध्यम उद्योजक भांडवल उभारू शकतात, याचा फायदा सर्वानी घेतला पाहिजे. आज माधवबाग, पु ना गाडगीळ ज्वेलर्स, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस अशा मराठी उद्योजकांच्या कंपन्या आज बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट झालेल्या आहेत.

मराठी तरुणांनी भविष्यात केवळ नोकऱ्यांच्या मागे न लागतात उद्योगी झाले पाहिजे, लाखो उद्योजक निर्माण झाले पाहिजेत अशा स्वरूपाचे स्वप्न घेऊन महाराष्ट्रात अनेक संस्था, बिझनेस चेंबर्स काम करतात. अशा सर्व संस्था एकत्र करण्याचे काम ‘मी उद्योजक होणारचं’च्या माध्यमातून श्री. निलेश मोरे आणि श्री. हेमंत मोरे करीत आहेत. उद्योजकता हा केवळ व्यवसाय नाही, तर एक प्रवास आहे – जिद्दीचा, चिकाटीचा आणि सतत शिकत पुढे जाण्याचा. अशा प्रेरणादायी मंचामुळे नव्या पिढीतील उद्योजकांना दिशा मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळते.

अर्थसंकेत संपर्क – ८०८२३४९८२२

Dr Amit Bagwe
Dr Amit Bagwe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *