स्वतःचे स्टेटस घडवा – डॉ. अमित बागवे
स्वतःचे स्टेटस घडवा – डॉ. अमित बागवे
क्षत्रिय मराठा समाज रत्नागिरीच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
रत्नागिरी हा समुद्रसंपन्न जिल्हा, हिरवाईने नटलेला, निसर्गरम्य स्वर्ग. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला अपार संधी आहे, परंतु त्याकडे आपण गंभीरपणे लक्ष देत नाही. जगभरातील अनेक देश पर्यटनावरच अर्थव्यवस्था उभी करतात. आपल्या जिल्ह्यातही समुद्रकिनारे, किल्ले, सांस्कृतिक वारसा आणि निसर्गसंपदा यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठी बाजारपेठ मिळू शकते. पर्यटकांचे स्वागत, त्यांचे आदरातिथ्य, सोयीसुविधा—या गोष्टींकडे लक्ष दिले, तर रत्नागिरी महाराष्ट्राचं ‘पर्यटन राजधानी’ ठरू शकते.
जगात असे अनेक देश आहेत जे फक्त पर्यटनावर चालतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याने हे दाखवून दिलं आहे. रोहन परब या तरुणाने कॉलेज शिकत असताना मालवणमध्ये कयाकिंगचा व्यवसाय सुरू केला. दोन-तीन बोटीने सुरुवात करून आज त्याच्याकडे पन्नासपेक्षा जास्त बोटी आहेत! देवगडच्या जोईल भाऊ बहिणीने ‘फ्लाईंग कोकण’ नावाने भारतातील पहिली समुद्रकिनाऱ्यावरील ‘झिप लाईन’ सुरू केली आणि प्रचंड यश मिळवलं. वॉटर स्पोर्ट्स, होम स्टे, साहसी पर्यटन—ही सर्व उद्योगाची नवीन दारे आहेत. मग रत्नागिरीने मागे का राहायचं?

आपला समाज अजूनही कर्मकांडात अडकलेला आहे. “असेल हरी तर देईल खाटल्यावरी” असे नुसते म्हणत बसून चालत नाही. दैव त्याच्यासोबत असतं जो प्रयत्न करतो. म्हणून आपले ध्येय निश्चित करून कृतीशील पद्धतीने एकेक पाऊल टाकणे गरजेचे आहे.
आज आपल्या हाती जग बदलवणारे तंत्रज्ञान आहे. हेच तंत्रज्ञान जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असतं तर त्यांनी जगावर अधिराज्य गाजवलं असतं! पण दुर्दैवाने आपण हे तंत्रज्ञान वापरण्याऐवजी दुसऱ्यांचे सोशल मीडियावरील स्टेटस पाहण्यात वेळ घालवतो. लक्षात ठेवा –”आपला जन्म दुसऱ्यांचे स्टेटस बघण्यासाठी नाही, तर स्वतःचे स्टेटस घडवण्यासाठी झाला आहे!”

आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने जगभरात क्रांती घडवली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांसाठी AI तंत्रज्ञान महत्वाचे झाले आहे. जे कोणी या नवीन तंत्रज्ञानाची कास धरणार नाहीत, ते नक्कीच देशोधडीला लागतील आणि जे या तंत्रज्ञानासोबत मैत्री करतील, ते नुसते मोठे होणार नाहीत, तर करोडपती व अरबोपती होतील.
आरक्षण महत्त्वाचं आहे, पण त्यावर विसंबून राहून चालणार नाही. आज मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. परंतु हे आरक्षण सर्वांच्या उपयोगी पडणार आहे का ? महाराष्ट्रात जवळपास ३० टक्केहून अधीक मराठा समाज आहे. परंतु शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांचा विचार केल्यास, आरक्षणाचा संपूर्ण समाजाला फायदा होण्याची शक्यता कमी आहे. काही लोकांना त्याचा फायदा नक्कीच होईल, ते आयुष्यात पुढे सुद्धा जातील, पण बाकीच्या लोकांचं काय ? त्यामुळे आरक्षण जरी मिळते तरी स्वतःच्या आणि समाजाच्या विकासासाठी व्यवसायाकडे वळणे सुद्धा आवश्यक आहे. संपूर्ण समाजाने उद्योग धंदा करणाऱ्या मराठ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
आज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी प्रचंड कर्ज घेतलं जातंय, महागाई वाढतेय, पण आपलं उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधणे भाग आहे.
शेअर बाजार हा त्यापैकी एक मोठा मार्ग आहे. पण दुर्दैवाने मराठी माध्यमांनी शेअर बाजाराला जुगार ठरवलं. आजपर्यंत मराठी प्रसारमाध्यमांनी शेअर बाजार गुंतवणुकीबद्दल नकारात्मक चित्र निर्माण करून ठेवले आहे. शेअर मार्केट म्हणजे जुगार, तिथे पैसे बुडतात असे सातत्याने दाखवले जाते. भारतात शेअर मार्केटला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत व ज्या दिवशी शेअर मार्केट सुरु झाले, त्या दिवसापासून आजपर्यंत शेअर बाजारात गुंतवणूक करून अनेक लोक करोडपती आणि अब्जाधीश झाले आहेत. शेअर मार्केट मध्ये लांब पल्ल्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ट्रेडिंग मध्ये नुकसान होण्याचीच शक्यता जास्त असते. ज्या रोजच्या वापरातील वस्तू अथवा सेवा आपण वापरतो, त्या कंपन्यांचे शेअर्स लॉन्ग टर्म साठी विकत घेऊन ठेवले पाहिजेत.

शेअर बाजारात गुंतवणूक करत नसल्यामुळे आपल्याला शेअर मार्केटमधून व्यवसायासाठी बिनव्याजी भांडवल उभे करता येते हे सुद्धा माहित नाही. आज छोट्या उद्योजकांसाठी भांडवल उभारण्यासाठी ‘SME Listing’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक कोटी पासून पुढे भांडवल आपण उभे करू शकतो. त्यासाठी फक्त २ वर्षे जुनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणे आवश्यक आहे. शेअर मार्केट गुंतवणूक असो, भांडवल उभारणी असो किंवा व्यवसायाची प्रसिद्धी असो. अर्थसंकेतच्या माध्यमातून आम्ही हे काम करीत आहोत. ज्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, ‘माधवबाग’ने शेअर मार्केट मध्ये लिस्टिंग करून भांडवल उभे केले आहे. अनेक लहान मोठ्या उद्योजकांना खूप मोठा फायदा झाला आहे. कोरोनामधून बाहेर पडून पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी प्रेरणा मिळावी, पुन्हा एकदा भरारी घेऊन या संकल्पनेतून ‘हेलिकाप्टर’ मध्ये पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा ‘विश्वविक्रम’ सुद्धा आम्ही केला. ज्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
अर्थसंकेतच्या माध्यमातून आम्ही उद्योजकांसाठी सतत कार्य करत आहोत. ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’, ‘स्टार्टअप अवॉर्ड्स’, ‘मराठी उद्योजकांची दिवाळी पहाट’—असे अनेक कार्यक्रम आम्ही राबवले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सारख्या ऐतिहासिक ठिकाणी हजारो मराठी उद्योजकांना आम्ही पहिल्यांदाच व्यासपीठ मिळवून दिलं. गुंतवणूक, उद्योजकता, शेअर मार्केट या विषयांवर ३० हुन अधिक पुस्तके लिहिली आहेत. जी अधिक माफक किंमतीत ई बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेल वर मराठीतील दिग्गज उद्योजकांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. तसेच अर्थसंकेतचे व्हाट्सऍप चॅनेल सुद्धा आहे, ज्याच्या माध्यमातून रोज नवनवीन माहिती प्रसारित केली जाते.
जैन, मारवाडी, गुजराती, सिंधी समाज एकत्र येऊन आपला व्यापारी, आर्थिक पाया भक्कम करत आहेत. त्यांच्यासारखीच मराठा समाजाचीही जागतिक संस्था निर्माण होणे आवश्यक आहे—‘जागतिक मराठा समाज संघ’. एकत्र येऊन आपण केवळ समाजासाठीच नाही, तर देशासाठीही महान कार्य करू शकतो.

- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड

