माझी कन्या भाग्यश्री योजना I Bhagyashree Yojana I

माझी कन्या भाग्यश्री योजना

‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ अशी एक म्हण आहे. या म्हणीवरुन स्त्री जन्माच महत्व विशद होते. ज्यांना मुले आहे, त्यांच्या वृध्द आई-वडिलांना वृद्धापकाळात वृद्धाश्रमात ठेवल्याचे उदाहरण आपण अनेकदा ऐकतो. उलट मुलींनी वृद्धापकाळात आपल्या घरी आईवडिलांना ठेऊन त्यांची काळजी घेतल्याचेही बघतो. दोन्ही घरी प्रकाश देणाऱ्या मुलींची भ्रुणहत्या रोखण्यासोबतच, मुलींच्‍या शिक्षण व आरोग्याकडे लक्ष देवून सुधारणा करणे, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, मुलींचा होणारा बालविवाह थांबविणे आणि मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी राज्य शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरु केली आहे.

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना ही सर्व कुटूंबात जन्माला येणाऱ्या दोन अपत्य मुलीसाठी लागू केली आहे. ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 7 लक्ष 50 हजार रुपये आहे, अशा समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना आहे. एका मुलीच्या जन्मानंतर आईने किंवा वडिलाने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केली असल्यास मुलीच्या नावे 50 हजार रुपये मुदत ठेव म्हणून बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवणूक म्हणून ठेवण्यात येईल. 50 हजार रुपये रक्कमेवर 6 वर्षासाठी मिळणारे व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल. पुन्हा मुद्दल रुपये 50 हजार रुपये गुंतवणूक करुन 6 वर्षासाठी देय होणारे व्याज वयाच्या बाराव्या वर्षी काढता येते. पुन्हा मुद्दल 50 हजार रुपये गुंतवणूक करुन 6 वर्षासाठी अनुज्ञेय होणारे व्याज अधिक मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता येते. आई/वडिलांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया केल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 50 हजार रुपये इतकी रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येते. जमा केलेल्या रक्कमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला देता येते.

दोन मुलीनंतर आई/वडिलाने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केल्यानंतर अनुज्ञेय रक्कम पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी 25 हजार रुपये इतक्या रक्कमेवर 6 वर्षासाठी अनुज्ञेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी तसेच वयाच्या बाराव्या वर्षी काढता येते. तसेच पुन्हा मुद्दल 25 हजार रुपये गुंतवणूक करुन 6 वर्षासाठी अनुज्ञेय होणारे व्याज अधिक मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता येईल. यासाठी आई/वडिलांनी कुटूंब नियोजन शस्त्रक्रीया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच रक्कम मुलीच्या नावावर जमा करता येते.

माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ घेण्यासाठी आई/वडिलाने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी सादर करणे आवश्यक आहे. या सुधारीत योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2017 रोजी व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलींना देण्यात येईल. ज्या कुटूंबामध्ये 1 ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे व त्यानंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाला व आई/वडिलाने कुटूंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसऱ्या मुलीला 25 हजार रुपये योजनेचा लाभ देण्यात येईल. ज्या कुटूंबात पहिले अपत्य मुलगा व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास या योजनेचा लाभ देता येणार नाही. कुटूंबात पहिले अपत्य व दुसरे अपत्य मुलगी असल्यास लाभ देता येईल मात्र तिसरे अपत्य जन्माला आल्यास लाभ देता येणार नाही. तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक/दोन अपत्यांचेही लाभ बंद होतील. देण्यात आलेली रक्कम वसुल करण्यात येईल. लाभार्थी मुलीचे वडील राज्याचे मुळ रहिवाशी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत मुदत ठेवीत गुंतविण्यात आलेली मुळ मुद्दल रक्कम व त्यावरील अठराव्या वर्षी देय असणारे व्याज अनुज्ञेय होण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पुर्ण असणे व इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहीत असणे आवश्यक राहील. दुसऱ्या प्रसुतीच्यावेळी जर जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्या मुली योजनेच्या लाभास पात्र असतील. बालगृहातील अनाथ मुलींना सुध्दा या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी दत्तक पालकांनी मुलीचे बँक खाते उघडावे, त्या खात्यात रक्कम जमा करता येईल.

वयाची 18 वर्षे पुर्ण होण्यापूर्वी मुलीचा विवाह झाला असल्यास किंवा दहावीपूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा दहावी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून, मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम शासनाच्या नावे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल. मात्र नैसर्गीक कारणाने मुलीचा मृत्यू झाल्यास मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली रक्कम मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर पुर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देण्यात येईल.

माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र मुलींचे स्वतंत्र बँक खाते उघडावे लागेल. मुलीच्या नावाने रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मुळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देवून एक छायांकीत प्रत शासकीय कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 7 लाख 50 हजार रुपये असल्याचे तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सादर केल्यानंतरच या योजनेचा लाभ देता येईल. 1 जानेवारी 2014 ते 31 मार्च 2016 या कालावधीत कार्यान्वीत असलेली सुकन्या योजना आणि 1 एप्रिल 2016 ते 31 जुलै 2017 या कालावधीत कार्यान्वीत असलेली जुनी माझी कन्या भाग्यश्री या दोन्ही योजनेसाठी सदर कालावधीत लाभार्थ्याने अर्ज केला असेल व आजच्या निकषानुसार पात्र ठरत असेल तर त्या लाभार्थ्यांना देखील सुधारीत माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे मुलींच्या शिक्षणाकडे, तिच्या आरोग्याकडे पालक वर्ग विशेष लक्ष देतील. स्त्री जन्माचे स्वागत देखील उत्साहात करतील तसेच मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार येण्यास मदत होईल. त्यामुळे माझी कन्या भाग्यश्रीच आहे असेही पालक म्हणतील.

लेखक -जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

स्रोत – https://mr.vikaspedia.in/

Bhagyashree Yojana
Bhagyashree Yojana 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *