नका जाऊ लडाख ला, विचित्र वाटतंय ना? – भाग २

आपला लडाखी हितचिंतक

आत्माराम परब

संचालक, ईशा टूर्स

अध्यात्मिक लडाख

लडाख ही भूमी लडाखी साधू संतांची म्हणजे बुद्धीस्ट लामांची भूमी जे जगात शांततेच प्रतीक आहेत, जगात प्रेम, सद्भावनेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या सहवासात आपण शहरी मंडळी आलो तर आपल्या जात, धर्म, आंदोलनं, भ्रष्टाचार, दंगली अशा वातावरणात वाढलेल्या आपल्या मनावर परिणाम होतील, त्यामुळे आपण लडाख पासून लांब राहिलेले बरे

आदरातिथ्य

जगभरात तुम्ही कुठेही पर्यटक म्हणून गेला असाल पण लडाख च्या आदरातिथ्याला तोड नाही, मुळातच पहाडी माणसं बाहेरून करारी आणि कडक वाटतात पण आतून खूप गोड असतात आणि लडाखी माणसांनी त्यातही उंची गाठली आहे. लडाखी मग तो कोणत्याही धर्माचा असेल कमरेत थोडस वाकून झुले म्हटलं की ही मंडळी तुमच्या साठी काहीही करायला तयार असतात त्यामुळे अशा आदरातिथ्याची सवय लागली की दुसऱ्या ठिकाणी तुमची निराशा होऊ शकते ही निराशा टाळण्यासाठी लडाखला न गेलेलं बरं

सर्वोत्तम फोटोग्राफी

लडाख एवढं सुंदर आहे की जाऊन आलेल्या प्रत्येकाला अस वाटू लागतं की जगातला बेस्ट फोटोग्राफर मीच आहे, पण ती कमाल आपली नसते निर्सगाने एवढं भरभरून दिल आहे लडाखला की कुणीही फोटो काढले तरी ते सर्वोत्कृष्ट वाटतात, मलाही स्वतःला असंच वाटायचं किंवा मला भ्रम होता की मी चांगला फोटोग्राफर आहे असा भ्रम होऊ नये असं वाटत असेल तर लडाख ला जाऊ नका

लडाखच्या गोष्टी

लडाखला जाऊन आलेल्या व्यक्तीला लोक टाळतात कारण माहीत आहे का कारण तुम्ही लडाख बद्दल एवढं बोलता की लडाखला न गेलेली व्यक्ती कंटाळून तुम्हाला टाळू लागते. तुम्ही लडाख ला जाऊन आलेले असाल आणि नंतर तुम्ही स्वित्झर्लंड मध्ये असाल, नॉर्वे मध्ये असाल, ब्राझील मध्ये असाल किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये असाल, किंबहुना जगात कुठेही असाल तुम्ही तिथे लदाखशी तुलना करू लागला, सोबतच्या मंडळींना लडाख या सर्वांपेक्षा किती सुंदर आहे याच्या गोष्टी सांगू लागला आणि ते अति झालं की लोक तुम्हाला टाळू शकतात. त्यामुळे तुम्हाला कुणी टाळू नये असं वाटतं असेल तर लडाखला जाऊ नका.

भारतीय सैन्य

भारतीय सेना दलातील लोकांना प्रत्यक्ष भेटायचे असेल तर लडाख सारख दुसरं ठिकाण भारतात नाही. १९९९ च्या कारगिल युद्धा नंतर लेह मध्ये भारतीय सैन्याच्या १४ व्या core ची स्थापना झाली त्यामुळे मूळ लडाखी लोकांपेक्षा सैनिक जास्त दिसतात, त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधता येतो, प्रत्यक्ष युद्धभूमी वर जाता येत. ज्या ठिकाणी आपल्या सैनिकांच रक्त सांडलं आहे तिथे नतमस्तक होता येत. देशाभिमान काय असतो त्याची अनुभूतो घेता येते. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. माझ्या सोबत आलेल्या पर्यटकांनी एका सैनिकाला विचारलं “आप नाम क्या, और कहासे हो त्याने उत्तर दिलं हिंदुस्थानसे. आपल्या लोकांचा उत्साह भारी, ते म्हणाले हम भी हिंदुस्थानी है लेकिन आप हिंदुस्थान मे कहा से हो? मग मात्र त्यानं विचारल “हिंदुस्थानी होना हमारे लिए काफी नही क्या? क्या जरुरत है किस प्रांत से होना, किस धर्म और जाती का होना? हम अपने आप को सिर्फ हिंदुस्थानी क्यू नही कहते? डोळ्यात अंजन घालणार हे जळजळीत सत्य त्याने मांडले होते. लडाखमध्ये कुठे बौद्ध मॉनेस्ट्री मधून लडाखी chants ऐकू येतात, “ओम माने पदंमे हुंम” चे स्वर कानावर पडतात, केव्हा अजान चे सूर कानी येतात आणि त्याचवेळेला गुरुद्वारातुन गुरुवाणी देखील ऐकू येते. राष्ट्रीय एकात्मतेचा अनुभव आणि सर्व धर्म गुण्यागोविंदाने कसे राहतात हे पाहण्यासाठी लदाखलाच यावं लागेल. आपल्यातील काही जाती, धर्म, प्रांत मध्ये अडकलेल्या सामान्यजनाच्या मनावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे लडाखला न गेलेलंच बर.

तात्पर्य

जगातील या सर्वात सुंदर अशा ठिकाणी तुम्ही मुळीच जाऊ नका कारण तुम्हाला हे लडाख वेड लावेल, प्रेमात पडणं छान असत पण लडाखच्या बाबतीत त्या प्रेमाचं वेडात रूपांतर होतं आणि मग पंचाईत होते. हे सर्व नको असेल तर लडाखला जाणं टाळा आणि आनंदी रहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *