शेअर मार्केटच्या जगात सगळ्यांचे मनापासून स्वागत ! स्वागत ! स्वागत ! – डॉ अमित बागवे
नमस्कार मित्र – मैत्रीणिंनो,
सेन्सेक्सने आज ५०,००० चा टप्पा गाठला आणि पुन्हा एकदा शेअर मार्केट चर्चेत आले…
भाग भांडवल बाजार म्हणजेच शेअर मार्केटच्या या जगात तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत ! स्वागत ! स्वागत !
प्रत्येकालाच शेअर मार्केट बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. शेअर्सची खरेदी विक्री करायची असते. पण योग्य माहिती न मिळाल्यामुळे बरेच जण ह्यामध्ये सहभाग घेत नाहीत.
लोकांना वाटतं की हे काहीतरी जागावेगळ आहे. अथवा रॉकेट सायन्स आहे आणि मला हे समजणार नाही. परंतु हे असे काही नाही. तुम्ही कोणी मोठ्ठं विद्वान असण किंवा तुमच्याकडे एखादी मोठी पदवी असण्याची काहीही आवश्यकता नाही. फक्त आणि फक्त महत्त्वाच आहे ते म्हणजे तुमची दृष्टी. शेअर मार्केटकडे बघण्याचा दृष्टीकोन.
शेअर मार्केट म्हणजे ‘सट्टा बाजार’ किंवा ‘जुगार’ हा दृष्टीकोन बदलून गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून त्याकडे बघणे आवश्यक झाले आहे. वाढत जाणारी महागाई, रुपयाचे होणारे अवमूल्यन, जागतिक घडामोडी ह्या आणि अशा अनेक अडचणींवर सर्वोत्तम पर्याय म्हणजेच शेअर्स म्हणजे भाग भांडवल बाजारातील सुयोग्य गुंतवणूक.
‘सुयोग्य गुंतवणूक’ केल्यास भाग भांडवल बाजारातून मिळणारे उत्पन्न हे अति प्रचंड असते. दिर्घ पल्ल्याच्या [लोंग टर्म] गुंतवणुकीसाठी भाग भांडवल बाजार हे सर्वोत्तम साधन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिर्घ मुदतीसाठी भाग भांडवल बाजारातून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त असते. तसेच डिव्हिडंड म्हणजेच व्याजसुद्धा करमुक्त असते.
वोरेन बफे जगातील सर्वात श्रीमंत माणसापैकी एक. ज्याने फक्त गुंतवणूक करून २००८ साली श्रीमंतांच्या यादीत मानाचे पहिले स्थान मिळविले. वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून त्या त्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून त्यांनी हे स्थान मिळविले.
शेअर्स मध्ये पैसे गुंतवून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति होणे हे आपले लक्ष्य नाही. परंतु आपल्या आर्थिक उद्दिष्टांच्या पुर्तीसाठी, आपण नक्कीच ह्या साधनाचा वापर करू शकतो. प्रत्येकाला आर्थिक उद्दिष्टे असतात. जसे की घर विकत घेणे, गाडी विकत घेणे, लग्न करणे, मुलांचे शिक्षण, मुलांची लग्ने, निवृत्ती इ.इ. ह्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सुयोग्य गुंतवणूक करणे आवश्यक असते.
- डॉ अमित बागवे
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा !
शेअर मार्केट ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे I Share Trading Rules in Marathi I
अर्थसंकेत – मराठी उद्योजकांचे हक्काचे व्यासपीठ ! संपर्क – 8082349822