‘युरोप इंडिया लीडर’मध्ये मराठमोळ्या विद्याधर प्रभुदेसाईंची निवड

‘युरोप इंडिया लीडर’मध्ये मराठमोळ्या विद्याधर प्रभुदेसाईंची निवड

युरोप इंडिया सेंटर फॉर बिझिनेस अ‍ॅण्ड इंडस्ट्री (ईआयसीबीआय)च्या वतीने २०२० वर्षात भारत व यूकेमधील संबंधांना चालना देण्यासाठी ४० वर्षांखालील ४० व्यक्तींची निवड केली आहे. यात ठाण्यातील मराठमोळे उद्योजक विद्याधर प्रभुदेसाई यांची निवड झाली आहे. विद्याधर प्रभुदेसाई हे आशिया, आफ्रिका आणि इतर देशांतील तज्ञांचा सहभाग असलेल्या जागतिक थिंक-टँक लीडकॅप व्हेंचर्सचे सह संस्थापक आहेत.

ईआयसीबीआयतर्फे दरवर्षी ४० वर्षांखालील ४० युवा लीडर्सची निवड करण्यात येते. यंदा युरोपमध्ये गेलेल्या १४ महिला व २६ पुरुषांची यात निवड करण्यात आली आहे. या यादीत ऑस्ट्रिया, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, भारत, आयर्लंड, इटली, लाटव्हिया, लिथुआनिया, लक्समबर्ग, पोलंड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम या देशांतील तरुणाईचा समावेश आहे. अभिमानाची बाब म्हणजे यात विद्याधर प्रभुदेसाई या मराठमोळ्या उद्योजकाची निवड झाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रभुदेसाई हे आशिया, आफ्रिका आणि युरोमधील तज्ञांचा सहभाग असलेल्या जागतिक थिंक-टँक लीडकॅप व्हेंचर्सचे सह संस्थापक आहेत. लीडकॅप व्हेंचर्स हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे प्रादेशिक भागीदार आहेत. ते इंटरनेशनल फाउंडेशन फॉर पीस अँड डेव्हलपमेंटचे सदस्य देखील आहेत. ग्लोबल शेपर्स कम्युनिटीचे ठाणे हब, जे गतिशील आणि वैविध्यपूर्ण साधकांचे मजबूत नेटवर्क आहे. याचे ते संस्थापक आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून १० दशलक्षाहूनही अधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांना जागतिक बँकेचा पुरस्कारदेखील मिळालेला आहे. यासह त्यांना युनायटेड नेशन्स, फोर्ड फाऊंडेशन आणि रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स, लंडन यांची फेलोशिपदेखील मिळालेली आहे.

युरोप इंडिया लीडरमध्ये त्यांची निवड झाल्याबद्दल ते म्हणतात की, ‘४० युवा नेत्यांच्या यादीत स्थान मिळवण्याचा खरोखर मोठा सन्मान आहे. यामुळे मला अजून जोमाने काम करण्याची उर्जा मिळेल. युरोप आणि भारत यांच्यात सहयोग व सहकार्य मी ईआयसीबीआय आणि सहकारी नेत्यांसमवेत काम करण्यास उत्सुक असल्याचे’ही प्रभुदेसाई म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *