नका जाऊ लडाख ला, विचित्र वाटतंय ना? मग हे वाचा
नका जाऊ लडाख ला, विचित्र वाटतंय ना? मग हे वाचा – श्री . आत्माराम परब
साधारण १०-१२ वर्षांपूर्वी कुणाच्या खिजगीणतीत नसलेलं, साहसी लोकांसाठी प्रसिद्ध असलेल, अनेक दृष्ट्या गैरसमजुतीने बदनाम असलेल लडाख आज अचानक पर्यटकांच्या पसंतीस उतरून भारतात पहिल्या क्रमामांकावर का आलं? आज प्रत्येकाला लडाख ला जायचं आहे, कधी कुटुंबासोबत, कधी मित्रमंडळींना घेऊन, कधी ग्रुप मध्ये तर कधी एकटच, कधी मोटरसायकल वर, कधी सायकलवर सुद्धा, कधी कधीही न अनुभवलेल्या थंडीच्या मोसमात चादर ट्रेक साठी तर कधी स्नो leopard च्या शोधात
एवढ सार असलं तरीही मी सांगू शकेन लडाख ला न जाण्याची काही महत्वाची कारणे. लडाख ला जाण्यामुळे होणारे आजारच म्हणा ना.
लदाखच भूत
बऱ्याचदा आपण एखाद्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलो की पुन्हा त्या जागी क्वचितच जातो, कारणं अनेक असतात त्यातील वेळ आणि पैसे महत्वाची. विश्वास ठेवा लडाखच्या बाबतीत असं होतं नाही. तुम्ही एकदा गेलात की लडाख च भूत तुमच्या डोक्यावर बसत आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा आकर्षित करत, काहीशी दैवी किंवा Spiritual ताकत म्हणा ना. तुम्हाला लडाखच addiction लागत. तुम्ही लडाख हुन परत आल्यानंतर दुसऱ्या ट्रिप च्या प्लॅंनिंग ला सुरुवात करता आणि शेवटी पुन्हा लडाख ला जायचंच नक्की करता. मित्रांनो हे शेकडो लोकांच्या बाबतीत झालेलं मी पाहिलं आहे आणि मी तर जिवंत उदाहरण आहे. १९९५ मध्ये लदाखची पहिली भेट ही माझी मोटरसायकल वरून झालेली थरारक भेट होती तरीही २ वर्षांनी पुन्हा आकर्षित झालो आणि लडाख ला गेलो. मुंबई कस्टम सारखी कायमस्वरूपी सरकारी नोकरी सोडली आणि केवळ लडाखला पुन्हा पून्हा जात यावं यासाठी “ईशा टूर्स” ची स्थापना केली आणि लडाख ला जातच राहिलो तेही गेल्या २२ वर्षात हजारो लोकांना घेऊन, आज माझ्या स्वतःच्या १२७ लडाख वाऱ्या झाल्या असुनही खूप काही बाकी आहे असं वाटतं त्यामुळे मी सावधान करतो लडाख ला जाऊ नका आणि हे भूत तुमच्या डोक्यावर बसू देऊ नका.
लडाखचे सौंदर्य
लडाख मध्ये आहे काय नेमकं? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. खर तर लडाख हा प्रांत सर्वसामान्यांच्या निसर्गाच्या व्याख्येत बसणाराच नाही. निसर्ग म्हणजे बर्फाच्छादित पर्वत रांगा, त्यातून खळाळत वाहणाऱ्या नद्या, फुलं, फळं,डेरेदार वृक्ष, घनदाट जंगले, नदी, नाले, पक्षि, प्राणी आणि बरच काही. लडाख मध्ये यातील अनेक गोष्टी नाही आहेत. पण जे काही आहे ते अद्भुत, विस्मयकारक, उत्तुंग आणि अफाट आहे. निसर्गा समोर मनुष्य प्राणी किती कस्पटासमान आहे याची वेळोवेळी प्रचिती येते. लडाख म्हणजे जगाला शांततेची शिकवण देणाऱ्या बुद्धा ची भूमी, लडाख म्हणजे उघडे बोडके डोंगर पण त्यावर निसर्गाने केलेल रंगकाम, लडाख म्हणजे अथांग पसरलेली विविधरंगी तळी, लडाख म्हणजे जगातील सर्वात उंचीवरील रस्ते, कोणतेही प्रदूषण नसलेलं ठिकाण म्हणजे लडाख, आकाशगंगा पाहण्यासाठी जगातील उत्तम जागा म्हणजे लडाख, लडाख म्हणजे निसर्ग देवतेने आपल्या फुरसतीच्या वेळात निर्माण केलेला आविष्कार, डोळ्यात आणि कॅमेऱ्यात सुद्धा न मावणारा हा निसर्ग तुम्हाला झेपणार नसेल तर नका जाऊ आमच्या लडाखला.