भूतानचे पक्षीवैभव – भाग १
आत्माराम परब
भूतानचे पक्षीवैभव पाहायचे असेल तर नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम
भूतान हा सुखी माणसांचा देश. भूतानचा पर्यटनस्नेही हंगाम मार्च ते जून आहे, असे मानले जाते. पण, भूतानचे पक्षीवैभव पाहायचे असेल तर नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम. सृष्टीसौंदर्यात भर घालणारे नानाविध पक्षी तिथे या कालावधीत सहज दृष्टीस पडतात.
एखाद्या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला की मग त्या पर्यटनस्थळाचा सिझन अमुकतमुक आहे, वगैरे गोष्टींची चर्चा सुरू होते. त्यानुसार त्या पर्यटनस्थळी गर्दी वाढू लागते. पण कधी कधी हे ठरावीक सिझन सोडून भटकायचे ठरवले तर मग अनेक नवीनवीन गोष्टी आकर्षू लागतात.भूतानच्या बाबतीत हे नेमकं लागू पडते.
भूतानचा पर्यटनस्नेही सिझन म्हणजे मार्च ते जून. पण त्याऐवजी जर आपण नोव्हेंबर ते मार्च या काळात भूतानला गेलो तर आपल्याला एका अनोख्या सौंदर्याचा आनंद घेता येतो. तो म्हणजे तेथील पक्षीवैभव. या काळात तेथे थंडीचे प्रमाण प्रचंड असते. कधी कधी तापमान उणे दोनचार अंशापर्यंत जाते, तर सर्वसाधारणपणे पाच अंशावर स्थिरावलेले असते. पण याच काळात तेथील सृष्टीसौंदर्य खुलून येते. नानाविध असे स्थलांतरित पक्षी आणि तेथील स्थानिक पक्षी याच काळात नजरेस पडतात. भूतानच्या निसर्ग चक्रात हा कालावधी म्हणजे सुगीचा महिना म्हणावा लागेल.