अर्थसंकेत ‘नवं उद्योजक पुरस्कार सोहळा २०२१’ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये संपन्न !
नवं उद्योजकांनी शेअर बाजारात नोंदणी करणे फायदेशीर – श्री शंकर जाधव
तुमच्या उद्योगासाठी सुयोग्य सेगमेंट शोधणे अत्यावश्यक – श्री संजीव पेंढारकर
बुधवार दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी ऐतिहासिक वास्तू असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, दलाल स्ट्रीट, मुंबई येथे अर्थसंकेत ‘नवं उद्योजक पुरस्कार २०२१’ सोहळा संपन्न झाला. नवं उद्योजक पुरस्कार सोहळ्याचे हे सातवे वर्ष आहे.
पुरस्कार सोहळ्यासाठी बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक व बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे स्ट्रॅटेजी हेड श्री शंकर जाधव तसेच विको या सुप्रसिद्ध ब्रँडचे संचालक श्री संजीव पेंढारकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे व सह संस्थापक सौ रचना बागवे यावेळी उपस्थित होते.
मराठी समजातील नवं उद्योजकांचे कर्तुत्व जगासमोर आणण्याचा एक आगळा प्रयत्न म्हणजेच “अर्थसंकेत नवं उद्योजक पुरस्कार सोहळा” !
अर्थसंकेत मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र आहे. अर्थसंकेतचा ५० लाख हुन अधिक लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार आहे. अर्थसंकेत मराठी माणसांमध्ये आर्थिक व उद्योजकीय साक्षरता पसरविण्याचे कार्य गेली ८ वर्षे करीत आहे.
ग्रास ड्यू आयटी सोल्युशनचे श्री शेखर पवार, गृह रचना इंटेरिअर्सचे श्री संदीप चौधरी आणि पंकज चौधरी, ओहो स्पेसेसचे श्री प्रदीप मांजरेकर, हाय टेक लॅबोरेटरीजचे श्री पांडुरंग काकडे, वडापाव कट्टाचे श्री ओंकार धनावडे, अपरमश्रि ऑटोमेशनच्या सौ मनीषा पाटील आणि योगिता गणेश गिलेटकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सौ रचना लचके बागवे लिखित ‘बेसिक लेसन्स ऑफ फायनान्शील इन्व्हेस्टमेंट’ या इंग्रजी पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गुंतवणूक करताना विविध गुंतवणुकीचा विचार करणे आवश्यक आहे व त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे सुद्धा महत्वाचे आहे, म्हणूनच तीन वर्षांपूर्वी गुंतवणूक विषयवार मराठीत व आता तेच पुस्तक इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करण्यात आले असे सौ रचना लचके बागवे यांनी सांगितले.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये ३५० हुन अधिक लघु व मध्यम उद्योजकांनी तसेच १२ स्टार्ट अप उद्योजकांनी नोंदणी केली आहे. आपल्याला जर भांडवल हवे असेल आणि करोडो अरबो मध्ये व्यवसाय करायचा असेल तर शेअर बाजारात नोंदणी करणे आवश्यक असल्याचे अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांनी सांगितले. उद्योजक हा रोजगार निर्मिती करीत असतो, समाजासाठी कार्यरत असतो म्हणून नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे सुद्धा महत्वाचे आहे, असेही त्यांनी म्हंटले. आज भारतातील मोठे उद्योजक हे शेअर बाजारात नोंदणी करून भांडवल उभारणी करूनच मोठे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टार्ट अप उद्योजक हि आजची गरज आहे व नवनवीन संकल्पना घेऊन हे नवं उद्योजक व्यवसाय करीत आहेत हे नक्कीच कौतुकाचे आहे असे विकोचे संचालक श्री संजीव पेंढारकर यांनी म्हटले. तुमच्या उद्योगासाठी सुयोग्य सेगमेंट शोधणे अत्यावश्यक आहे व तुमचा व्यवसाय भारतात अथवा जगात कुठे पोहोचू शकतो याचा विचार सुद्धा करणे आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले.
नवं उद्योजकांनी शेअर बाजारात नोंदणी करणे फायदेशीर आहे. लघु उद्योजकांनी कमीतकमी ५० लाख व १ करोड रुपयांच्या भांडवलाची उभारणी सुद्धा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून केली आहे असे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे स्ट्रॅटेजी हेड श्री शंकर जाधव यांनी सांगितले. शेअर बाजारात नोंदणी करून भांडवल उभारणी केल्यावर आपल्या व्यवसायात भागीदार निर्माण होतात, परंतु जर आपल्याला करोडो अरबो रुपयांचा व्यवसाय करायचा असेल तर असे भागीदार जोडणे आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले.
सौ रचना लचके बागवे यांनी प्रमुख पाहुणे, सर्व उपस्थित मान्यवर व कार्यक्रमासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
ग्रास ड्यू आयटी सोल्युशनचे श्री शेखर पवार सायबर सेक्युरिटी क्षेत्रात कार्यरत आहेत. गृहरचना इंटेरिअर्सचे श्री संदीप चौधरी आणि पंकज चौधरी लहान तसेच मोठ्या घरांचे इंटेरिअरचे काम करतात व सोसायटयांसाठी पत्रांच्या शेडचे काम करतात, हाय टेक लॅबोरेटरीजचे श्री पांडुरंग काकडे यांची अहमदनगर येथे सुसज्ज अशी आरोग्य तपासणीची लॅबोरेटरी आहे, ओहो स्पेसेसचे श्री प्रदीप मांजरेकर फक्त ३० दिवसांत घराचे इंटेरिअर करून देतात तर वडापाव कट्टाचे श्री ओंकार धनावडे यांच्याकडे ४८ प्रकारचे वडापाव आणि सोन्यापासुन बनविलेल्या वडापावची नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. योगिता गिलेटकर या रियल इस्टेट क्षेत्रात काम करतात तर अपरमश्रि ऑटोमेशनच्या सौ मनीषा पाटील या घर तसेच उद्योग व्यवसायांसाठी लागणारी सेक्युरिटी कॅमेरे व इतर ऍटोमेशन मध्ये कार्यरत आहेत.
अर्थसंकेत संपर्क – ८०८२३४९८२२