IIT मंडी येथील संशोधक टीम ने धुक्यातून पाणी वेगळे करण्याचे तंत्र शोधले आहे. पाण्याची वाढती मागणी पाहता देशभरातील संशोधक धुके व मिस्ट यासारख्या अनपेक्षित स्रोतांतून पाणी वेगळे करण्याचे तंत्र शोधत आहेत. जगातील शुष्क व अर्ध-शुष्क प्रदेशातून सापडणाऱ्या विविध वनस्पतींच्या पानांमध्ये धुक्यातून पाणी वेगळे करण्याची क्षमता असल्याची माहिती इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी ,हिमाचल प्रदेश येथील असोसिएट प्रोफेसर व्यंकट कृष्णन यांनी दिली. या वनस्पतीचे नाव ड्रॅगन लिली हेड असे असून संशोधकांनी या पानांच्या जटिल संरचनांचा अभ्यास केला आहे. या पानांच्या पृष्ठभागाचा मायक्रोमीटर व नॅनोमीटर स्केल वर अभ्यास करून त्यांच्या वॉटर हार्वेस्टिंग क्षमतेबाबत संशोधन केले गेले. भारताच्या वाढत्या लोकसंख्येला पाण्याची गरज पूर्ण करण्यास केवळ धोरण व वर्तणूक बदल आवश्यक नसून निसर्गाने प्रेरित वैज्ञानिक आणि तांत्रिक नवकल्पनांची देखील आवश्यकता असल्याचे संशोधक म्हणाले.